Raj Thackeray : आशिया चषक (Asia Cup 2025) स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी झालेल्या भारत–पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारताने सात गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. मात्र, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाचं वातावरण होतं. अनेक नागरिकांनी “भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये” अशी भावना व्यक्त केली होती. पण केंद्र सरकारकडून बीसीसीआयला परवानगी मिळाल्यामुळे टीम इंडियाला मैदानात उतरावं लागलं.
या मुद्द्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या शैलीत केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर टिका केली. त्यांनी एक व्यंगचित्र काढून गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्यावर निशाणा साधला. या व्यंगचित्रात “अरे बाबांनो उठा… आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले” असा संवाद दाखवण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर “नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं?” असा बोचक सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
व्यंगचित्रात पहलगाम हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे प्रतीक दाखवण्यात आले आहे. त्यांच्याशी तुलना करून राज ठाकरेंनी बीसीसीआय आणि गृह मंत्रालयावर (Home Ministry) थेट हल्ला चढवला.
#पहलगाम #काश्मीर #PahalgamAttack #BCCI #ICC #AsiaCup #INDvsPAK#Cricket pic.twitter.com/GyJWLsGThw
— Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2025
संजय राऊतांचा सरकारवर हल्ला
भारत-पाक सामन्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, “टीम इंडियाला खेळायचं नव्हतं, पण सरकारने परवानगी दिल्यामुळे त्यांना पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा लागला.”
राऊतांनी भाजपवर (BJP) निशाणा साधत म्हटलं, “हस्तांदोलन केलं नाही म्हणून तुम्ही कौतुक करताय. पण हे पहलगाम हल्ल्याला उत्तर झालं का? देशासाठी लोक शहीद झाले, रक्त सांडलं आणि तुम्ही पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळलात. मग हे कौतुक कशाचं?” असा सवाल त्यांनी केला.