सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी राज ठाकरेंनी मांडली पक्षाची बाजू; म्हणाले…

 

मुंबई। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाहीच्या वादाने आपले डोके वर काढले आहे.

घराणेशाहीच्या वादावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. घराणेशाहीच्या वादामुळे अनेक नामांकित कलाकारांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात आहे.

माध्यमातील काही घटकांकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला जात आहे. मात्र या वादाचा आणि पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भातील ट्विट करत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या.

मी इथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी”, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

करण जोहर, सलमान खान आणि इतर दिग्गज कलाकारांनी सुशांत सिंह राजपूतवर अन्याय केल्याचेही बोलले गेले आहे. अशा सगळ्या वादात काही बातम्या समोर आल्या होत्या.

ज्यामध्ये कलाकारांवर अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा, अशी काही वृत्त प्रसारित करण्यात आली. या सगळ्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.