Share

Raj Thackeray : “मराठी जनतेने सरकारला झुकायला भाग पाडलं”, राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन

Raj Thackeray  : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात मराठी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला होता.  यावर प्रतिक्रिया देताना “एखादी मराठी भूमिका जर ठामपणे मांडली गेली, तर सरकार कितीही मोठं असलं तरी झुकतं,” असं ठाम मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत मांडलं. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती लागू करणारे दोन्ही शासन निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मराठी जनतेला ‘विजयाचा सलाम’ दिला.

“मी ऐकून घेईन… पण ऐकणार नाही!”

राज ठाकरे म्हणाले, “या निर्णयामागे केवळ आमचा मोर्चा नव्हता, तर प्रत्येक सामान्य मराठी माणसाची भावना होती. जर आमचा मोर्चा खरोखर निघाला असता, तर त्याचं स्वरूप ‘न भूतो न भविष्यति’ असं झालं असतं. ज्येष्ठांना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण झाली असती.”

हिंदी सक्तीचा विषय हळूहळू समाजावर लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटलं, “हे एक प्रकारचं स्लो पॉयझनिंग आहे – सुरुवातीला छोटा बदल करून पुढे मोठा प्रभाव घडवण्याचा डाव होता. मात्र जनतेच्या विरोधामुळे तो डाव सरकारच्या अंगाशी आला आणि अखेर शासन निर्णय मागे घ्यावा लागला.”

शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse ) यांनी यासंदर्भात संवाद साधल्याचं सांगताना राज ठाकरे म्हणाले, “ते मला म्हणाले, ‘तुम्ही ऐका’. मी त्यांना स्पष्ट सांगितलं – ऐकून घेईन, पण मान्य करणार नाही. आम्ही कुठल्याही प्रकारे ही सक्ती चालवून घेणार नाही.”

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र 

५ जुलै रोजीचा संयुक्त मोर्चा जरी रद्द झाला असला, तरी तो दिवस वाया जाणार नाही. संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी फोनवरून संपर्क साधून मेळाव्याचा प्रस्ताव दिला. त्यावर राज ठाकरेंनी लगेच संमती दिली आणि सांगितलं की, “ही एक सत्तेच्या विरोधातील निर्णायक लढाई ठरणार आहे. हा पक्षीय नव्हे, तर मराठी अस्मितेचा मेळावा असणार आहे.”

“आज सरकारने जीआर मागे घेतलाय, उद्या पुन्हा कोणत्या फंदात पडतील माहीत नाही,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारवर संशय व्यक्त केला. “हिंदी सक्ती ही एकप्रकारची हळूहळू झिरपवली जाणारी यंत्रणा होती – स्लो पॉयझन,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now