Rahul Narwekar : महाराष्ट्रात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुती सरकारमधून तब्बल आठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर येताच, अनेक नवे तर्क वितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना अध्यक्षपद दिले जाण्याची चर्चा रंगली आहे.
सामना या दैनिकातून या घडामोडींवर एक मोठा दावा करण्यात आला आहे. त्यात महायुतीतील (Mahayuti Government) आठ मंत्र्यांना काढून टाकण्यात येणार असल्याची आणि नव्याने काही चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांच्याशी एबीपी माझा (ABP Maza) ने संवाद साधला.
“पक्षाची इच्छा म्हणजेच माझी इच्छा”
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर यांनी माध्यमांतील बातम्यांपेक्षा आपल्या पक्षाच्या नेतृत्वावरच अधिक विश्वास असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “पक्ष कोणतीही जबाबदारी देईल, ती पार पाडण्यास मी तयार आहे. जी पक्षाची इच्छा, तीच माझी इच्छा.”
नार्वेकर यांना विचारण्यात आलं की मंत्र्यांच्या बदलाबाबत काय वाटतं? तेव्हा त्यांनी सांगितलं, “सर्व मंत्री चांगलं काम करत आहेत. मात्र पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असतो. मी अध्यक्ष असो किंवा मंत्री, शेवटी काम हे जनतेसाठीच करायचं आहे.”
“माझ्या पदावर मी समाधानी”
राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदावर काम करत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “अधिवेशनात १५२ लक्षवेधी सूचना मांडल्या गेल्या. मी माझ्या जबाबदारीवर समाधानी आहे. मात्र मंत्रीपद मिळालं तरी ते देखील चोख बजावण्याची तयारी आहे.”
दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे सध्या सरकारविरोधी काही ठाम भूमिका घेत असल्याने, त्यांना अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं, असा दावा सामनामधून करण्यात आला आहे.
राजकीय समीकरणं बदलणार?
या सर्व हालचालींमुळे आगामी काही दिवसांत राज्यातील राजकीय समीकरणं नव्याने ठरू शकतात. मंत्रिमंडळ फेरबदलाची ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार असून त्यातून महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि सत्ता संतुलन यांचं चित्र स्पष्ट होणार आहे.