रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला गौतम गंभीर; म्हणाला, राहुल द्रविड कधीच तसं करणार नाही

माजी प्रशिक्षक ‘रवी शास्त्री’ यांचा भारतीय क्रिकेट संघातील कार्यकाळ नुकताच संपुष्टात आला. रवी शास्त्री शेवटचे भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून UAE मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान दिसले होते. रवी शास्त्री यांनी त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात भारतीय संघाला अभूतपूर्व यश मिळवून दिले.

रवी शास्त्री यांच्या कोचिंग कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी क्रिकेट जिंकले. तसेच अनेक वर्षे भारताला कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन ठेवले. पण रवी शास्त्री यांनीही अनेकदा सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली खेळलेला संघ भारतातील सर्वोत्तम संघ आहे.

म्हणजेच रवी शास्त्री आपल्या कोचिंग कार्यकाळात स्वतःचे आणि संघाचे कौतुक करण्यात कधीच मागे राहिले नाहीत.यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने रवी शास्त्रींवर टीका केली आहे. गंभीरचे असे मत आहे कि, ‘स्वत:च्या यशासाठी स्वतःचे नाहीतर इतरांचे कौतुक करणे चांगले आहे.’

भारताचा माजी सलामीवीर ‘गौतम गंभीरने’ एका मुलाखतीत रवी शास्त्रीमधील काही कमतरतांबद्दल विचारले असता गंभीर म्हणाला, “मला एक गोष्ट विचित्र वाटली ती म्हणजे जेव्हा तुम्ही चांगले खेळता, तेव्हा तुम्ही स्वतःचीच प्रशंसा करत नाही”

“इतर लोक याबद्दल बोलत असतील तर ठीक आहे, पण जेव्हा आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकला तेव्हा आमच्यापैकी कोणीही हा जगातील सर्वोत्तम संघ असल्याचे विधान केले नाही. तुम्ही जिंकल्यावर इतरांना त्याबद्दल बोलू द्या. तुम्ही ऑस्ट्रेलियात जिंकलास, ही खूप मोठी गोष्ट होती, तुम्ही इंग्लंडमध्ये जिंकलास कारण तुम्ही चांगली कामगिरी केलीस आणि त्याबद्दल काही शंका नाही.”

रवी शास्त्री यांनी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातील मालिका विजय हा १९८३ च्या विश्वचषकापेक्षा मोठा विजय असल्याचे म्हटले होते. याच गोष्टीवर निशाणा साधत गौतम गंभीरने राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांच्यातील फरक स्पष्ट केला.

तो पुढे म्हणाला की, “तुम्ही इतरांना तुमची प्रशंसा करू द्या, राहुल द्रविडच्या तोंडून तुम्ही अशा गोष्टी ऐकणार नाही. भले भारत चांगला खेळो अथवा वाईट. तुम्ही चांगले खेळता किंवा वाईट, त्यामध्ये नम्रता खूप महत्त्वाची आहे. मला वाटते की द्रविडचे सर्वात मोठे लक्ष एका चांगल्या खेळाडूला आधी चांगली व्यक्ती बनवणे असेल.”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.