आदिवासी महिला बनली अनोख्या बॅंकेची चालक-मालक; पद्मश्री देऊन सरकारनेही केला सन्मान

एका बॅंकेची मालक-चालक…कपाळावर ठसठशीत कुंकू, नाकात मोठी नथ, नववारी साडी, गावाकडची भाषा आणि लाघवी बोलणं अशी असू शकते का? तर हो,या अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या बीजमाता म्हणजे सीडबॅंकच्या (Seedbank) मालक-चालक राहीबाई पोपेरे (Rahibai Popere)! यांचे राहणीमान गावाकडील असले तरी विचार मात्र प्रगतीशील आणि अनोखे आहेत.

त्यांचे बालपण अत्यंत सामान्य आणि शेतकरी कुटुंबात गेलं. त्यांच्या वडिलांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी जागा मात्र खूपच कमी होती. लहानपणापासून राहीबाईंना शेतीची खूप आवड. त्यांना त्यातील विविध बारीकसारीक गोष्टी समजून घेण्याची अनोखी रूची होती. त्याचं १२ व्या वर्षी लग्न झाल्यावर सासरी असंच विविध पध्दतीने शेतीत काम करण्याची इच्छा होती. पण सुरूवातीला अवघड वाटायचं.

काही काळानंतर त्यांना समजले की,गावात आजारी लोकांचं प्रमाण वाढतं आहे. आधी तर बाळ कधी कुपोषित दिसत नव्हते. पण आता जी बालकं जन्माला येत आहेत त्यांचं वजन कमी असतं. याचं कारण काय असावं यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. हायब्रीड किंवा संकरित वाणांमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग पुन्हा एकदा त्यांनी शेतीमध्ये आपल्या लेकरांसाठी रमायचे ठरवले.

मूळात राहीबाई निरक्षर आहेत. अगदी त्यांच्या घरातील सदस्य पण एवढे काही शिकलेले नाहीत. पण त्या निसर्गाच्या शाळेत खूप काही शिकल्या. लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. त्यांनी पुन्हा जोपासण्यास सुरूवात केली. मग त्यांचा असा सुरू झाला बियाणे जमण्याचा ते बीजमाता बनण्यापर्यंतचा प्रवास!

त्यांनी‌ पारंपरिक पद्धतीने विविध बियाणे गोळा केली आहेत.प्रत्येक बियाणांना नावे देखील दिली आहेत. आज राहीबाईंच्या बियाण्यांच्या बँकेत ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. प्रत्येक बियाणाची माहिती त्यांना तोंडपाठ आहे. कधीही कोणत्याही क्षणी विचारलं तर हा घेवडा,वाल,सफेद वांगं,गावठी हिरवं वांगं,भोकरीची भाजी तांदुक्याची भाजी इ.नावे कित्येक नावं त्या एकामागून एक घेत राहतात.

आपण ज्यांची नावे कधी ऐकली पण नाहीत अशी बियाणे, रानभाज्या यांच्या नावांसोबत त्या वैशिष्ट्य पण सांगत जातात. एवढेच नव्हे तर शेतात त्याचा कसा वापर करायचा हे आवर्जून सांगतात. शेणाच्या मातीने बनलेल्या या बॅंकेत राहीबाई बियाणेरूपी भरभरून संपत्तीत भर टाकत असतात.

या सगळ्या कामांत ‘बायफ’ (BAYAF)  संस्थेच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे त्यांच्या कार्याला एक नवी‌ दिशा मिळाली. त्यामुळे त्यांनी गावरान बियाणांची बँक स्थापन केली आणि २०२० साली पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी देखील ठरल्या.

गावातील महिला देखील निसर्गाशी दोस्ती करत एवढं सगळं करू शकते हा नवा आदर्श राहीबाईमुळे समाजात निर्माण झाला आहे.
– प्रज्वली नाईक.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.