Turkey : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर, तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने घेतलेली ठाम भूमिका आणि शस्त्रास्त्र, ड्रोन पाठवून दिलेली मदत भारतासाठी धक्कादायक ठरली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने जेव्हा पाकिस्तानवर जोरदार प्रत्युत्तर दिलं, तेव्हा तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला साथ देत भारताच्या विरोधात उभं राहणं भारतीय जनतेला खटकलं आहे.
भारताच्या मदतीचा विसर?
हेच तुर्की काही महिन्यांपूर्वी भूकंपामुळे धुळीस मिळालं असताना, भारताने सर्वाधिक मदत पुरवली होती. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, औषधं, अन्नधान्य, आरोग्यसेवा आणि बचाव उपकरणं घेऊन भारतीय पथक तुर्कीमध्ये दाखल झालं होतं. मात्र, तुर्कीने भारताच्या मदतीचे उपकार विसरून पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतल्याने, भारतीय जनतेच्या भावना तीव्रतेने दुखावल्या आहेत.
‘बॉयकॉट तुर्की’ मोहिमेला व्यापाऱ्यांचा पाठिंबा
देशभरात सध्या ‘बॉयकॉट तुर्की’ अभियान जोर धरत असून, नागरिक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर तुर्कीमधील वस्तूंवर बहिष्कार घालत आहेत. पुण्यासह अनेक शहरांतील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून आयात होणाऱ्या वस्तूंपासून स्वतःला दूर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
सफरचंदावर बहिष्कार
पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून येणाऱ्या सफरचंदांची आयात थांबवली असून, त्यामुळे स्थानिक बाजारात ही फळं अचानक गायब झाली आहेत. सय्योग झेंडे, पुण्यातील फळ व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी म्हणाले, “आम्ही आता इराण, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथून सफरचंद मागवत आहोत.” आणखी एका व्यापार्याच्या म्हणण्यानुसार, “तुर्कीच्या सफरचंदांची मागणी ५०% नी घसरली आहे. ग्राहक आता स्वतः विचार करून तुर्की उत्पादने नाकारत आहेत.”
मार्बल व्यापाऱ्यांचाही मोठा निर्णय
उदयपूरमध्ये मार्बल व्यापाऱ्यांनी देखील तुर्कीवरून संगमरवरी आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कपिल सुराणा, उदयपूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष, म्हणाले, “तुर्की जर पाकिस्तानला पाठिंबा देत असेल, तर आमच्याकडून त्याच्याशी कोणताही व्यापार केला जाणार नाही.” ते पुढे म्हणाले, “भारताच्या मार्बल बाजारात सुमारे ७०% संगमरवर तुर्कीतून येतो, मात्र आता देशभरातील संघटनांनी एकत्र येऊन बहिष्कार घातला, तर जागतिक स्तरावर भारताचा ठाम संदेश पोहोचेल.”
सामाजिक माध्यमांवरही मोहिमेचा प्रभाव
‘#BoycottTurkey’ आणि ‘#StandWithIndia’ हे हॅशटॅग्स सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. यावरून जनतेचा रोष स्पष्ट दिसतो आहे. अनेक प्रख्यात प्रभावक आणि नागरिकांनी तुर्कीच्या भूमिकेचा निषेध करत त्यांच्याशी व्यापार तोडण्याचे आवाहन केलं आहे.
सरकारकडून प्रतिक्रिया?
सध्या केंद्र सरकारकडून या मोहिमेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी व्यापारी आणि सामाजिक संघटनांनी उचललेला पाऊल भारताच्या सामूहिक असंतोषाचे प्रतीक ठरत आहे. राजकीय वर्तुळात देखील तुर्कीच्या भूमिकेवर टीका सुरू झाली आहे. विरोधकांनी तसेच सत्ताधाऱ्यांनीही तुर्कीला चपराक देणाऱ्या वक्तव्यांद्वारे भारतीय जनतेच्या भावना प्रतिध्वनित केल्या आहेत.
तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा देऊन केवळ भारताशीच नव्हे, तर भारतीय जनतेच्या मनाशी शत्रुत्व पत्करले आहे. आता व्यापारी, ग्राहक आणि सामाजिक संस्था मिळून तुर्कीविरोधातील हे ‘आर्थिक शस्त्र’ वापरू पाहत आहेत. जागतिक स्तरावर याचे पडसाद उमटल्यास भविष्यात इतर देशांनाही भारताच्या हितविरोधात भूमिका घेण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागेल.