Pune Crime : पुणे (Pune) शहरात स्पा सेंटरांच्या नावाखाली चालणाऱ्या मोठ्या देहविक्री रॅकेटविरोधात अखेर पोलिसांनी गंभीर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना आव्हान देत सांगितले की, या धंद्याचे मुख्य सूत्रधार ‘धनराज’, ‘प्रिया’ आणि ‘अनुज’ यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत तातडीने कारवाई करावी.
आयुक्तांनी स्पष्ट केले की, जो पोलिस उपायुक्त किंवा वरिष्ठ निरीक्षक या टोळीला गाठून मकोका अंतर्गत प्रस्ताव सादर करेल, त्याला पोलिस दलाकडून थेट बक्षीस दिले जाईल.
वेश्याव्यवसायाचे जाळ
शहरात या त्रिकुटाचे तब्बल शंभरहून अधिक स्पा सेंटर चालतात. नावापुरते ‘बॉडी मसाज’ किंवा ‘रिलॅक्सेशन सेंटर’ असले तरी प्रत्यक्षात त्यातून मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय सुरू आहे. पोलिसांच्या रडारवर असूनही आजवर मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलिस पोहोचले नाहीत. व्यवस्थापक पातळीवर कारवाई होत असली, तरी मूळ आरोपी मात्र मोकाट फिरत आहेत.
अलीकडील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या कारवाईत फक्त 15 वर्षांची मुलगी देहविक्रीत अडकलेली आढळली होती. यामुळे शहरातील या अवैध धंद्याचे भीषण वास्तव पुन्हा उघड झाले.
सोशल मीडियावरून खुलेआम जाहिरात
‘थाई मसाज’, ‘बॉडी स्पा’ अशा नावांनी सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप आणि वेबसाईट्सवरून या स्पा सेंटरची जाहिरात केली जाते. दररोज नवे ग्राहक या जाळ्यात खेचले जातात. मात्र पोलिसांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले का, असा सवाल महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
पोलिस यंत्रणेवर टीका
गेल्या वर्षी सामाजिक सुरक्षा विभाग बरखास्त करून ‘मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग’ स्थापन करण्यात आला. परंतु, अपेक्षेप्रमाणे ठोस कारवाई न झाल्याने अनेक स्पा पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. काही पोलिस कारवाया निवडक आणि प्रभावहीन असल्याचा आरोपही होत आहे.
अमितेशकुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत कडक शब्दांत सांगितले “या त्रिकुटाविरुद्ध मकोका अंतर्गत निर्णायक कारवाई अपरिहार्य आहे. कोणीही अधिकारी हे जाळे उद्ध्वस्त करण्यात यशस्वी ठरल्यास, त्याला पोलिस दलाकडून बक्षीस मिळेल.”