Kishor Shinde : पुणे (Pune) महापालिकेत काल (६ ऑगस्ट) एक गंभीर वाद उफाळून आला, ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) चे माजी नगरसेवक किशोर शिंदे (Kishor Shinde) आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishor Ram) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघांमध्ये धक्कादायक धमकींची देवाणघेवाण झाली.
किशोर शिंदे यांनी आयुक्तांना “मी तुला महाराष्ट्राबाहेर पाठवीन” अशी धमकी दिली, तर नवल किशोर राम यांनी प्रतिकार करत, “मी घरात घुसून मारेन, माहित आहे का मी कोण आहे?” असा संतप्त प्रतिवाद केला. या प्रकरणामुळे आता वादाला मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय रंग चढू लागला आहे.
नेमकं काय घडलं महापालिकेत?
किशोर शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण घडलेला प्रकार उलगडला. ते म्हणाले की, महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्यातील वस्तूंच्या चोरीची बातमी समोर आल्याने, त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून निवेदन देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते महापालिकेत गेले, मात्र आयुक्तांच्या बैठकीमुळे थेट त्यांना भेट न घेता थांबावे लागले.
यावेळी आयुक्तांनी त्यांच्यावर चिडून, “निघून जा, बाहेर जाऊन बस” अशी भाषाच वापरल्याचा आरोप शिंदेंनी केला. त्यानंतर आयुक्तांनी “मी तुला घरात घुसून मारेल” अशा शब्दांत धमकी दिल्याचा खुलासा शिंदे यांनी केला.
‘मनसेचा गुंड’, ‘पैशाचा माज’, अपमानकारक भाषा वापरण्याचा आरोप
किशोर शिंदे यांनी असा आरोप केला की, नवल किशोर राम यांनी त्यांना “तू मनसेचा गुंड आहेस”, “तुला पैशाचा माज आहे” असे अपमानकारक शब्द वापरले. तसेच, “मराठी संस्कृती बिघडवता” असा आरोप करत यूपी-बिहारची भाषा वापरण्याचा आरोपही त्यांनी केला.
या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्याचीही मागणी शिंदेंनी केली आहे. शिवाय, पोलिसांनी स्वतःच किशोर शिंदे यांच्यावर 353 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे, ज्यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.
चोरी प्रकरणावरून वाद अधिक गहिरा
या सगळ्याचा मुळ मुद्दा म्हणजे राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) हे माजी आयुक्त निवृत्त झाल्यानंतरदेखील एक महिना शासकीय बंगल्यात राहिल्याचे समोर आले. त्यांच्या काळात त्या बंगल्यातून लाखो रुपयांच्या वस्तू गायब झाल्याची चर्चा आहे.
नवीन आयुक्त नवल किशोर राम यांना पदभार स्वीकारताना त्या वस्तूंची अनुपस्थिती जाणवली आणि नव्याने त्या गोष्टी बसवण्यासाठी निविदा काढण्याची वेळ महापालिकेवर आली. मात्र, त्यांनी याबाबतचे तपशील माहीत नसल्याचे सांगितले. काही वस्तू नव्याने बसवण्याची गरज निर्माण झाल्याचे मात्र त्यांनी मान्य केलं.
या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करत नवल किशोर राम यांची बदली करण्याची मागणी केली आहे. मराठी माणसाला अपमानित केल्याचा आरोप करत, “जशास तसे उत्तर” देण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






