Indore Crime : पुण्यातील (Pune City) एका राष्ट्रीय नेमबाज महिला खेळाडूला (National Shooter Woman) भोपाळ (Bhopal City) ते इंदूर (Indore City) प्रवासादरम्यान मोठ्या गैरवर्तनाला सामोरं जावं लागल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. शूटिंग स्पर्धेनंतर त्या ‘वर्मा ट्रॅव्हल्स’च्या स्लीपर कोच बसमध्ये परतत असताना, बसचालक आणि दोन मदतनीस अशी तीनजणांनी मध्यरात्री विनयभंगाचा प्रयत्न केल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ‘वर्मा ट्रॅव्हल्स’च्या बसमध्ये घडला. आरोपी नशेत असल्याचं पुढे तपासात स्पष्ट झालं. खेळाडूने तात्काळ विरोध दर्शवून बसकर्मचाऱ्यांना दूर ढकललं, मात्र तरीही त्यांनी वारंवार तिच्याकडे वाईट हेतूने हात लावण्याचा प्रयत्न केला.
रात्री 12 वाजता बसमध्ये नेमकं काय घडलं?
भोपाळ आणि इंदूर दरम्यान वेगाने धावणाऱ्या बसमध्ये चालक व दोन मदतनीस नशेत होते. पहिल्यांदा गैरवर्तन झाल्यानंतर खेळाडूने स्पष्ट शब्दांत त्यांना फटकारलं, पण आरोपींनी काही तासांतच चार वेळा पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा तिचा आरोप आहे. रस्त्यात कुणीही मदतीला न आल्याने ती संपूर्ण प्रवासभर तणावात होती.
आरोपींना लाथाबुक्क्या
बस इंदूरमध्ये पोहोचल्यावर पोलिस तपासणी सुरू असल्याचं दिसताच खेळाडूने धाडस दाखवत मदतनीसाला लाथाबुक्क्या मारून प्रतिकार केला. दुसरा मदतनीस हस्तक्षेप करू लागल्यावर त्यालाही तिने चोप दिला. यानंतर परिस्थिती बिघडताच बसचालकासह तिघे आरोपी पळून गेले; मात्र पोलिसांनी काही वेळातच त्यांना अटक केली.
१२ दिवसांपूर्वीही इंदूरमध्ये विनयभंग
अशाच धक्कादायक घटनेत 26 ऑक्टोबर रोजी दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा इंदूरमध्ये विनयभंग झाल्याची तक्रार नोंद झाली होती. त्यामुळे इंदूरमधील महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.