Share

Pune Crime News: जिवलग मित्रांकडूनच विश्वासघात! चारचाकीत बसवून घेऊन गेले, अचानक पिस्तूल काढली अन्…; पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

Pune Crime News: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात बुधवारी संध्याकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. चऱ्होली (Charholi) परिसरातील अलंकापुरम (Alankapuram) चौकाजवळ व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (Nitin Gilbile) यांच्यावर त्यांच्या दोन मित्रांनीच गोळीबार करून त्यांचा खून केला. जागेच्या व्यवहारातून उद्भवलेल्या वैयक्तिक वादामुळे हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

गोळीबाराची थरारक घटना

बुधवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथील अलंकापुरम रस्त्यावर नितीन गिलबिले आपल्या काही परिचितांसोबत उभे होते. त्याचवेळी त्यांचे मित्र अमित जीवन पठारे (Amit Pathare) आणि विक्रांत ठाकूर (Vikrant Thakur) चारचाकीत तेथे आले. त्यांनी गिलबिले यांना “चल, थोडं बोलायचं आहे” असं सांगत गाडीत बसवलं. काही वेळाने त्यांनी गाडी गिलबिले यांच्या हॉटेलच्या दिशेने नेली. अचानक त्याच गाडीतून पिस्तूल काढून नितीन यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली.
त्या ठिकाणी एक ते दोन राऊंड गोळीबार झाला, आणि गिलबिले गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांची धावपळ

घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस (Dighi Police) आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात या हत्येमागे प्लॉटिंगच्या व्यवसायातील व्यवहाराचा वाद असल्याचं स्पष्ट झालं आहे. संशयितांमध्ये अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांचा समावेश असून, त्यांचा शोध सुरू आहे.

नितीन गिलबिले हे जमीन खरेदी-विक्री (Land Dealing) आणि प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अलंकापुरम रस्त्यावर स्वतःचं हॉटेल सुरू केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी व्यावसायिक गाळे बांधून भाड्याने दिले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या हत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. लोकांमध्ये एकच चर्चा “मित्रावर विश्वास ठेवायचा तरी कुणावर?”

घटनेमागील कारणाचा शोध

पोलिसांच्या तपासानुसार, गिलबिले, पठारे आणि ठाकूर हे तिघे एकाच व्यावसायिक गटात होते. मात्र, अलीकडेच झालेल्या जमिनीच्या व्यवहारात मोठा वाद निर्माण झाला होता. याच वादातून सूडाच्या भावनेतून ही थरारक हत्या घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now