Pune Crime Krishna Andekar : पुणे (Pune City) शहरातल्या नाना पेठेत (Nana Peth) झालेल्या आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्याकांडानं संपूर्ण शहर हादरलं होतं. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी झालेल्या या खुनामध्ये तब्बल १२ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील नऊ गोळ्या अंगावर लागल्यामुळे आयुष्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये कुख्यात गुंड बंडू आंदेकर (Bandu Andekar) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह १३ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा बंडूचा मुलगा कृष्णा आंदेकर (Krishna Andekar) बराच काळ पोलिसांना चकवा देत होता.
दरम्यान, या प्रकरणातील तपास अधिकारी शैलेश संखे (Shailesh Sankhe) यांनी थेट कृष्णाला फोन करून “तुझा एन्काऊंटर होईल” अशी धमकी दिल्याचं समोर आलं. या फोनकॉलनंतर घाबरलेला कृष्णा सरळ समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) हजर झाला. आत्मसमर्पणानंतर पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी सोपवलं. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं?
५ सप्टेंबरच्या संध्याकाळी आयुष आपल्या भावाला क्लासवरून आणायला गेला असताना, नाना पेठ परिसरात पार्किंगमध्येच दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर तपासाची दिशा थेट आंदेकर टोळीपर्यंत पोहोचली. तपासात बंडूसह अनेक जणांना पोलिसांनी बुलढाणा (Buldhana) आणि गुजरात (Gujarat) इथून अटक केली. शिवराज (Shivraj), शुभम (Shubham), अभिषेक (Abhishek) आणि लक्ष्मी आंदेकर (Laxmi Andekar) यांना न्यायालयानं १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, तपासात मोठा धक्कादायक खुलासा झाला. हत्या प्रकरणाचं सूत्र बंडूच्या मुलगा कृष्णाच्या हातात असल्याचं स्पष्ट झालं. कृष्णाच्या सांगण्यावरूनच आयुष्याला ठार मारण्यात आलं, अशी माहिती पुढे आली आहे. याच कारणामुळे तो पोलिसांच्या रडारवर होता.
पोलिसांवर आरोप
यापूर्वी न्यायालयात हजर असताना बंडू आंदेकरनं पोलिसांवर गंभीर आरोप केला होता. “जर कृष्णा पोलिसांसमोर हजर झाला नाही, तर त्याला एन्काऊंटर करतील” अशी धमकी पोलीस देत असल्याचं त्याने न्यायाधीशांसमोर सांगितलं होतं. अगदी त्याच आरोपानंतर अवघ्या २४ तासांत कृष्णा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.
पुढील कारवाई
कृष्णा आंदेकरचं आत्मसमर्पण हा या संपूर्ण गुन्हेगारी प्रकरणातील निर्णायक टप्पा मानला जातो. त्याच्या चौकशीतून खुनाचं नियोजन, आरोपींशी असलेलं नातं आणि संपूर्ण कटाचा तपशील बाहेर येण्याची शक्यता आहे. पुण्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ माजवणाऱ्या या घटनेचं पडसाद अजूनही उमटत आहेत.