Share

पुण्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना खजूर अन् मोदक भरवत एकत्र सोडला रोजा अन् उपवास

पुण्यातील कॅम्प भागात हिंदू-मुस्लिम एकतेचा अनुभव देणारी एक घटना समोर आली आहे. रमजान महिना आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धार्थ ग्रंथालय आणि कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय रोजा अदा करण्याच्या आणि उपवास सोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू मुस्लिम(Hindu-Muslim) बांधवानी एकत्र येत खजूर आणि मोदकाचा आस्वाद घेतला.(pune camp hindu muslim roja and fast left together)

या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिवंगत पत्रकार महेश जांभुळकर आणि सिद्धार्थ ग्रंथालय यांच्या मदतीने रमजान महिन्यामधील चतुर्थीच्या दिवशी हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी उपवास सोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. पण गेल्या वर्षी पत्रकार महेश जांभुळकर यांचे निधन झाल्यामुळे या कार्यक्रमात खंड पडला.

पण यावेळी कर्तव्य फाउंडेशनने पुढाकार घेत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी कॅम्प भागातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र आले होते. यावेळी हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना खजूर भरवतात आणि मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना मोदक भरवतात. अशाप्रकारे कॅम्प भागातील सिद्धार्थ वाचनालयाच्या आवारात उपवास सोडण्याचा हा कार्यक्रम पार पडतो.

लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. “रमजान व गणेश चतुर्थीनिमित्त खजूर-मोदक कार्यक्रमातून सर्व धर्मियांनी दिलेला सामाजिक एकतेचा संदेश कौतुकास्पद आहे.” पुण्यातील कॅम्प भाग हा बहुभाषिक सांस्कृतिक परिसर म्हणून ओळखला जातो.

या भागात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन धर्माचे लोक एकत्र राहतात. देशात घडणाऱ्या धार्मिक वादाचा या परिसरावर कोणताही परिणाम होत नाही. या परिसरातील सर्व धर्माचे लोक सामाजिक सलोखा जपतात. या परिसरातील हिंदू आणि मुस्लिम धर्माचे लोक एकत्र येत सगळे सण साजरे करतात. कॅम्प भागात विविध समाजाच्या मिरवणूका निघतात.

गेल्या अनेक वर्षांपासून कुरेशी मस्जिद या ठिकाणी या मिरवणुकांचे स्वागत करण्यात येते. या भागातील मुस्लिम संघटना कोहिनुर हॉटेल या ठिकाणी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करतात. तसेच या भागातील हिंदू बांधव देखील मुस्लिम धर्मीयांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करतात.

महत्वाच्या बातम्या :-
‘देशातील वाढत्या महागाईवर पंतप्रधान मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे’
सोने-चांदीचा भाव गडगडला, दोन दिवसांत चांदी १७०० रुपयांनी झाली स्वस्त, तर सोने…
जहांगीरपुर हिंसाचारात अटक झालेला आरोपी निघाला करोडपती, तपासात झाले अनेक धक्कादायक खुलासे

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now