Pune Crime : वनराजला मारुन माझा मुलगा हिरावला, आता जावयालाही मुलगा नसल्याचं दु:ख कळण्यासाठी बंडू आंदेकरकडून आयुषचा बळी? पुणे पोलिसांची कोर्टात धक्कादायक माहिती

Pune Crime : गणेश विसर्जनाच्या आधी पुणे शहरात नात्यांमधील वैरामुळे रक्तरंजित कहाणी घडली. नाना पेठेत (Nana Peth Area) १९ वर्षीय तरुण आयुष कोमकर (Ayush Komkar) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने केवळ शहरच नाही तर संपूर्ण राज्य हादरलं आहे.

पोलीस तपासात उघड झालं की, एकूण १३ जणांनी हा खून करण्याचा कट रचला होता. त्यापैकी दोन आरोपींनी भवानी पेठेतील (Bhavani Peth Area) पार्किंगमध्ये पिस्तूल फायर करून आयुष्याचा जीव घेतला. पोलिसांच्या मते ही हत्या केवळ गुन्हेगारी वर्चस्वासाठी नव्हे, तर जुन्या कौटुंबिक वैरातून झाल्याचा संशय आहे.

आईचा आरोप आणि पोलिसांची दिशा

आयुषची आई कल्याणी कोमकर (Kalyani Komkar) हिने तक्रारीत स्पष्टपणे म्हटलं आहे की, “माझा मुलगा वनराजला (Vanraj) मारून आम्हाला दु:ख दिलं, आता माझ्या जावयालाही तोच वेदनेचा अनुभव द्यावा, या हेतूनेच बंडू आंदेकर (Bandu Andekar) टोळीने आयुषला ठार मारलं.” तिच्या या विधानानंतर पोलिसांनी आंदेकर टोळीवर कडक कारवाई सुरू केली.

आरोपींची नावे आणि तपासाची दिशा

आत्तापर्यंत सहा आरोपींची नावे समोर आली आहेत. वृंदावनी वाडेकर (Vrundavani Wadekar), तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर (Swaraj Wadekar), अमन पठाण, सुजल मेरगु आणि बंडू आंदेकर. हे सर्व आरोपी न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आणखी पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

रेकीपासून मर्डरपर्यंत नियोजन

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आधी रेकी केली होती. सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad) यांच्या घरावर देखील नजर ठेवण्यात आली होती. याशिवाय याच टोळीवर भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth) पोलीस ठाण्यात अन्य गुन्हे नोंद आहेत. आरोपींकडून वापरलेली पिस्तूल, गोळ्या आणि दुचाकी शोधून काढण्यासाठी तपास सुरु आहे.

न्यायालयीन सुनावणीतील तपशील

तपास अधिकारी चेतन मोरे (Chetan More) यांनी कोर्टात माहिती दिली की, आरोपींनी भवानी पेठेत खून करून “इथे फक्त आंदेकरच” अशी दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. म्हणूनच दाखल गुन्ह्यात नव्या कलमानुसार वाढ करण्यात आली आहे.

आंदेकर टोळीने आधीही आंबेगावमध्ये (Ambegaon) गायकवाड कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे या टोळीवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांचा दावा आहे की, टोळी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हा खून रचला गेला असून, अजूनही काही फरार आरोपींचा शोध घेणे बाकी आहे.