प्रियंका गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे केंद्रातील भाजप सरकार घाबरले

नवी दिल्ली | गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने बुधवारी प्रियंका गांधी यांना नोटीस दिली. एका महिन्याच्या अवधीत दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला रिकामा करण्यात यावा, असे आदेश दिले आहेत.

मोदी सरकारने प्रियंका गांधी यांचे सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका यांनी आपली आजी आणि वडील यांचा भयानक मृत्यू पहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील हा धोका टळलेला नाही.

अशा परिस्थितीत प्रियंका यांचे सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे हे भाजपाचे हीन राजकारण आहे. प्रियंका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे केंद्रातील भाजप सरकार घाबरले आहे. असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटीसमुळे १ ऑगस्टपर्यंत प्रियंका गांधी यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. सुरक्षा व निवासस्थान काढून घेण्याच्या केंद्राच्या या निर्णयावर थोरात यांनी मोदी सरकारवर टीका केली.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून केंद्रातील भाजपा सरकार घाबरले आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी सातत्याने भाजपा सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल जाब विचारत होते.

त्यामुळे भाजपाची कोंडी होत असून, त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणूनच त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत, म्हणून अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे. असेही थोरात म्हणाले.

मात्र, भाजपा सरकारने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी प्रियंका व राहुल गांधी हे जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारतच राहतील. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहतील. असेही थोरात म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.