प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री; या निर्णयानंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या….

पुणे | प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे लवकरच राजकारणात एन्ट्री करणार आहेत. येत्या ७ जुलै रोजी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

प्रिया बेर्डे यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, कोरोनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस कलाकारांच्या पाठिशी उभा राहिली. शरद पवार, सुप्रिया ताई, अजित पवार यांनी प्रत्येक घटकाचा विचार केला आहे.

त्यामुळे प्रिया बेर्डे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी हा पक्ष आपला पक्ष वाटतो. टीव्ही ९ मराठीशी बोलताना चाकणकर यांनी याबाबत माहिती दिली.

प्रिया बेर्डे यांच्यासह सिध्देश्वर झाडबुके, शकुंतलाताई नगरकर, सुहासिनी देशपांडे, विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

रुपाली चाकणकर यांनी पुढे असेही सांगितले की, राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि कला विभागाच्या वतीने सातत्याने कलाकारांच्या समस्या सोडवल्या जातात.

या विभागाच्या वतीने प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी त्यांचे स्वागत करते, असेही चाकणकर म्हणाल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.