Punjab : पंजाबमध्ये तुरुंगातील कैद्यांबाबत आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबमधील तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांना एक नवीन सुविधा मिळणार आहे. तुरुंगातील कैदी आपल्या जोडीदारासोबत आता एकांतात वेळ घालवू शकणार आहे.
याकरिता त्यांच्यासाठी एक खास खोलीही बनवण्यात आली आहे. तसेच या भेटीदरम्यान पती-पत्नी शारीरिक संबंधही बनवू शकतात, असे सांगितले जात आहे. तुरुंगात पती-पत्नीला एकांतवासाची परवानगी देणारे पंजाब हे पहिले राज्य ठरले आहे. याआधी कैद्यांना ही परवानगी नव्हती.
गुरजीत सिंग हे कैदी या सुविधेचा लाभ घेणारे पहिले कैदी आहेत. त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोणत्याही तुरुंगात कैद्याला एकटेपणा जाणवत असतो. त्यामुळे तो नैराश्यात राहतो. परंतु, आता ही सुविधा दिल्यानंतर जेव्हा माझी पत्नी मला तुरुंगात भेटायला आली तेव्हा आम्हाला काही तास एकांतात घालवण्याची परवानगी मिळाली. हा माझ्यासाठी मोठा दिलासा होता, असे ते म्हणाले आहेत.
यासंदर्भात बोलताना पंजाबचे विशेष महासंचालक हरप्रीत सिद्धू बीबीसीला सांगतात की, तुरुंगात नसलेल्या जोडीदाराला शिक्षा करण्यात काही अर्थ नाही. कैद्यांचा तणाव नियंत्रणात यावा आणि त्यांचे समाजात परत येणे सुनिश्चित व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही कैद्यांना पंजाबच्या तुरुंगात एकांतात त्यांच्या जोडीदाराला भेटू देण्याचा निर्णय घेतला. देशातील हा अशा प्रकारचा पहिला पायलट प्रोजेक्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच पुढे त्यांनी सांगितले की, २० सप्टेंबर रोजी पहिल्या तीन तुरुंगांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली. ३ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील २५ पैकी १७ तुरुंगांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जोडप्यांचे मिलन किंवा त्यांच्यातील लैंगिक संबंध ही एक गरज आहे. अनेक देशांतील तुरुंगांमध्ये याची परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमांनुसार धोकादायक कैदी, गुंड आणि दहशतवादी यांना ही सुविधा मिळणार नाही. मुलांचे लैंगिक शोषण करणारे, लैंगिक अत्याचार करणारे आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप असलेल्यांनाही ही सुविधा मिळणार नाही. तसेच ज्या कैद्यांना टीबी, एचआयव्ही, लैंगिक आजार आहेत त्यांनाही ही परवानगी मिळणार नाही. अशा वेळी कारागृहातील डॉक्टरांकडून मंजुरी घ्यावी लागेल.
तसेच नियमानुसार सर्वाधिक काळ तुरुंगात असलेल्या कैद्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्यांना मूल आहे त्यांनाही प्राधान्य मिळेल, असे सांगण्यात आले आहे. अनेक देशांमध्ये या गोष्टीला परवानगी आहे. यात अमेरिका, फिलिपाइन्स, कॅनडा, सौदी अरेबिया,जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
Nurse: काय सांगता? कोमातून बाहेर आल्यानंतर नर्स म्हणाली, मला देव भेटला; डॉक्टरांनाही दिला ‘हा’ पुरावा
spiders: खतरनाक! ‘या’ व्यक्तीने आपल्या खोलीत पाळलेत ३०० विषारी कोळी, डॉक्टरही झाले हैराण
Optical illusions: ‘या’ फोटोमध्ये लपलेला बेडूक शोधणे जवळपास आहे अशक्य, ९९% लोकं झालेत फेल
King Cobra: बुटाच्या आतून अचानक बाहेर आला किंग कोब्रा आणि मग.., व्हिडीओ पाहून थांबतील हृदयाचे ठोके