नाद खुळा! १० वीच्या पठ्ठ्याने तयार केली इलेक्ट्रॉनिक बाईक, तेही भंगाराच्या सामानातून

दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढताना दिसून येत आहे. सर्वसामान्य लोकांना आता हे भाव परवडणार नाही असे लक्षात येत आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता इलेक्ट्रीक गाड्यांकडे वळले आहे.

अशात दहावी झालेल्या तरुणाने लॉकडाऊन काळात चक्क इलेक्ट्रॉनिक बाईक तयार केली आहे. प्रथमेश सुतार असे या इलेक्ट्रॉनिक बाईक तयार करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो कर्नाटकमध्ये राहतो.

कोरोनाच्या काळात अनेकांनी वेगवेगळे जूगाड केले असताना या तरुणाने थेट इलेक्ट्रॉनिक बाईक तयार केली आहे.विशेष म्हणजे ही बाईक त्याने भंगारातल्या सामानातून तयार केली आहे.

प्रथमेशचे वडिल एक इलेक्ट्रीशियन आहे.त्यामुळे बाईकसाठी लागणारे सर्व सामान त्याने आपल्या वडिलांकडूनच घेतले. या बाईकला तयार करण्यासाठी त्यांनी एसिड बॅटरी विकत घेतली होती, यासर्व सामानातून त्याने एक नवीकोरी बाईक तयार केली आहे.

एकदा चार्जिंग केल्यानंतर हि बाईक ४० किलोमीटरपर्यंत चालते. तसेच या बाईकमध्ये रिव्हर्स गियरसुद्धा आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत चालले आहे, त्यामुळे मला लॉकडाऊनमध्ये काहीतरी वेगळे करायचे होते, त्यामुळे मी ही बाईक तयार केली आहे, असे प्रथमेशने सांगितले आहे.

माझ्या मुलाने मोकळ्या वेळात ही बाईक तयार केल्याने मी खुपच आनंदी आहे. मी एक इलेक्ट्रीशियन असून मला बॅटरी बनवण्याचे एवढे ज्ञान नाही, पण माझ्या मुलाने जे केले आहे, त्याचा मला अभिमान आहे, असे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटात सर्वच लोक घरी बसलेले होते, अनेक जणांनी टाईमपास करत वेळ घालवला तर अनेकांनी वेळेचा सदुपयोग करत गोष्टी शिकल्या आहे. प्रथमेशने लॉकडाऊनचा चांगला उपयोग केला असून त्याने इलेक्ट्रॉनिक बाईक तयार केली आहे. त्याने इतक्या कमी वयात केलेला हा प्रयोग आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.