Kalwa Hospital : डॉक्टर, बघा तो खाली कोसळलाय, हात तरी लावा…, कळव्यात 40 वर्षीय रुग्णाचा तडफडत अंत

Kalwa Hospital : कळवा (Kalwa) येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे प्रशांत जाधव (Prashant Jadhav) या ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. रुग्ण वेदनेने तडफडत असतानाही डॉक्टरांनी कोणतीही तातडीची मदत न दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला.

दिवा (Diva) भागातील रहिवासी असलेल्या प्रशांत जाधव यांना पायाला दुखापत झाल्यानंतर २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन देऊन विश्रांती करण्यास सांगितले; परंतु मध्यरात्रीनंतर त्यांच्या वेदना तीव्र झाल्या आणि प्रकृती बिघडू लागली.

जाधव बेडवर तडफडत असताना नातेवाईक आणि मित्र वारंवार उपस्थित डॉक्टर तसेच नर्स यांना मदतीसाठी विनवण्या करत होते. “डॉक्टर, बघा… तो खाली पडलाय… किमान हात तरी लावा, उपचार करा…!” असा आर्त स्वर रुग्णालयात घुमत होता. परंतु ड्यूटीवरील डॉक्टरांनी हलण्यासही नकार दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. कर्मचार्‍यांनीही परिस्थितीवर दुर्लक्ष केल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्रशांत जाधव यांचा मृत्यू झाला.

या निष्काळजीपणामुळे संतप्त नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात एक तासाहून अधिक वेळ गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar Group) चे पदाधिकारी स्वप्नील अशोक रोकडे (Swapnil Rokade) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी डॉक्टरांकडे कठोर सवाल उपस्थित करून दोषी डॉक्टर व नर्स यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली.

स्थिती बिघडत चालल्याने रुग्णालयाच्या डीन स्वप्नाली कदम (Swapnali Kadam) यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त नागरिकांना शांत करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणामुळे शासकीय रुग्णालयांतील निष्काळजीपणा, रुग्णांना न मिळणारी वेळेवर मदत आणि व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अशा घटनांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी आता अधिक जोर धरत आहे.