Pranjali Dhumal: कर्णबधिरांच्या ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम नेमबाजी कौशल्य दाखवत महाराष्ट्रातील प्रांजली धुमाळ (Pranjali Dhumal) हिने टोकियो (Tokyo) येथे भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात तिने जबरदस्त खेळी करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. यापूर्वी ब्राझील (Brazil) येथील स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तुलच्या प्राथमिक फेरीत जागतिक विक्रम करूनही अंतिम फेरीत अपयश आलं होतं. ते अपयश भरून काढण्याचा निर्धार तिने या स्पर्धेत प्रत्यक्ष कामगिरीतून सिद्ध केला.
दहा मीटरच्या प्रकारात टोकियोत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र, २५ मीटरमध्ये मी यशस्वी होणारच असा दिलेला शब्द तिने खरा केला. अंतिम फेरीत ३४ गुणांची भक्कम कमाई करत युक्रेनच्या हाल्यना मोसिना (Halyna Mosina) हिला दोन गुणांनी मागे टाकत तिने सुवर्णावर शिक्कामोर्तब केलं.
भारतीय नेमबाज अनुया प्रसाद (Anuya Prasad) हिला या प्रकारात ब्राँझपदक गमवावं लागलं. कोरियाच्या जिवॉन जेऑन (Jiwon Jeon) हिने शूटऑफमध्ये केलेल्या उत्कृष्ट नेमबाजीमुळे अनुया अंतिम तीन नेमबाजांमध्ये स्थान मिळवू शकली नाही. यापूर्वीही प्रांजलीने या ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत अभिनव देशवालच्या साथीत मिश्र सांघिक दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे या स्पर्धेतील हे तिचं दुसरं सुवर्ण ठरलं.
अंतिम टप्प्यात चूक टाळण्याचा निर्धार करत प्रांजलीने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. पहिल्या टप्प्यात पाचपैकी चार नेम साधत तिने पुढाकार घेतला. नवव्या फेरीपर्यंत ही आघाडी राखण्यात ती यशस्वी झाली. त्याच वेळी मोसिनाने तिला ३० गुणांवर गाठलं; परंतु शेवटच्या दहाव्या फेरीत प्रांजलीने जबरदस्त संयम राखत चार गुणांची कमाई केली, तर मोसिनाला फक्त दोन गुण मिळाले. त्यामुळे सुवर्णपदक प्रांजलीच्या खांद्यावर आलं.
प्रांजलीने प्राथमिक फेरीत ५७३ गुण मिळवत तिने स्वतःचाच ५७२ गुणांचा जागतिक विक्रम मोडला. ही ऐतिहासिक कामगिरी तिने गत वर्षी झालेल्या जागतिक कर्णबधिर नेमबाजी स्पर्धेत केली होती. अनुया प्रसाद ५६९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत सात सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन ब्राँझ अशी एकूण १६ पदकांची कमाई केली आहे.





