Share

Pragabha Kolekar Reveals Bad Experiences About Industry: ‘चल माझ्यासोबत… फक्त तू आणि मी’, अभिनेत्रीला उद्घाटनासाठी बोलावलं आणि मालकाने केली नको ती मागणी

Pragabha Kolekar : मराठी माणसाच्या मनात सिनेअभिनेत्री म्हणजे एक गौरवाचं नाव… पण या झगमगाटामागे काही काळे पडसाद असतात, जे बाहेरून दिसत नाहीत. अशीच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वाट्याला आलेली एक अनुभवांची बोच लपवून ठेवणारी गोष्ट आता समोर आली आहे. अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर (Pragabha Kolekar) हिनं नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आपल्यावर घडलेल्या धक्कादायक प्रसंगांचा पर्दाफाश केला आहे. फक्त बॉलिवूडच नाही, तर मराठी इंडस्ट्रीतसुद्धा काहीजण आपली झाकलेली विकृती अशा कार्यक्रमांमध्ये उघडी करत असल्याचं ती म्हणते.

प्रगल्भा कोळेकर (Pragabha Kolekar) ही ‘अंतरपाट’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री. एका सोनाराच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी तिला प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. कार्यक्रम छान पार पडला, आरती झाल्यानंतर दुकान मालकाने तिला विचारलं – “तुमचा पुढचा प्लॅन काय?” प्रगल्भा म्हणाली, “घरी जाणार आहे.” त्यावर तो म्हणतो, “प्लॅन करू का?”

ती पुढं सांगते, “मी त्यांना विचारलं, कसला प्लॅन? तर ते म्हणाले – कुठेतरी जाऊ या का? मला ते खूपच विचित्र वाटलं. मी सरळ विचारलं, ‘तुम्ही मला असा प्रश्न का विचारताय?’ तेव्हा त्यांनी सांगितलं, ‘आधीही आम्ही काही अभिनेत्रींना बोलावलं होतं, त्या सगळ्या ओके म्हणाल्या होत्या. तुम्ही काही करू नका, पण आम्हाला जज करू नका!’”

प्रगल्भाने या सगळ्यावर ठाम उत्तर दिलं – “मी कुणाला जज करत नाही, पण मी माझ्या कर्तृत्वावर काम मिळवलंय. तुम्ही तुमचं पाहा, मी माझं बघते. मी घाबरत नाही!”

ती पुढे म्हणते, “बऱ्याचदा मीटिंगच्या नावाखाली बोलावतात, पण खरंतर ऑडिशनच नसते. काही जण म्हणतात – ‘तू मला भेट, मी तुला स्टार बनवतो.’ काही जण डायरेक्ट विचारतात – ‘तुला कुठे फिरायला आवडतं? चल बसूया का?’ इतकी खालची पातळी असते की, पहिल्याच भेटीत असे प्रश्न विचारले जातात. हीच खरी इंडस्ट्रीची काळी बाजू आहे.”

प्रगल्भाचा अनुभव ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. यावरून हे स्पष्ट होतं की, कलाकार होणं जितकं चकाकदार वाटतं, तितकं ते आतून सलतंही. तिचं धाडस निश्चितच प्रेरणादायी आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now