Poultry Farming Success: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील अतिश लक्ष्मण काळे (Atish Laxman Kale) या तरुणाने एक प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे. इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पुणे (Pune) येथे पूर्ण करूनही, शहरात नोकरीच्या संधी असूनही त्यांनी गावात परतण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या मागे न धावता, काहीतरी स्वतःचं निर्माण करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावातच कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला.
१५ लाखांची सुरुवातीची गुंतवणूक
या व्यवसायासाठी सुरुवातीला त्यांनी आपल्या नातलगांकडून आणि वडिलांकडून आर्थिक मदत घेतली. शेड उभारणी, ५००० कोंबड्यांची खरेदी, खाद्य, औषधे, पाणीपुरवठा आणि मजूर यासाठी एकूण १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली.
‘कावेरी’ जातीची निवड आणि नियोजनबद्ध संगोपन
अतिश यांनी खास ‘कावेरी’ (Kaveri) जातीच्या कोंबड्यांचे संगोपन सुरू केले. या जातीला ७० ते ९० दिवसांत विक्रीयोग्य वजन येते. प्रत्येक टप्प्यावर अन्न आणि आरोग्याचं योग्य नियोजन करून त्यांनी खर्च कमी ठेवला आणि उत्पादन वाढवले. सध्या त्यांच्या फार्ममध्ये दोन मोठे शेड आहेत, जिथे वर्षभरात ३ ते ४ बॅचेस घेतल्या जातात.
यात्रोत्सवात जबरदस्त मागणी, दरही वाढतो!
पंढरपूरच्या प्रसिद्ध वारीच्या हंगामात कोंबड्यांची विक्री सर्वाधिक होते. याच काळात दर २२० ते २५० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतो. याच हंगामाला लक्षात घेऊन अतिश ४००० नर कोंबड्या तयार ठेवतात. त्यामुळे त्या विशिष्ट कालावधीत मोठं उत्पन्न मिळतं.
आता ८० लाख ते १ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल
अतिश यांचा व्यवसाय आता चांगलाच विस्तारला आहे. वर्षभरात ८० लाख ते १ कोटी रुपयांची उलाढाल होते. खर्च वजा जाता प्रत्येक बॅचमधून त्यांना चांगला नफा मिळतो. ही यशोगाथा तरुणांना गावाकडेच संधी शोधण्याचा संदेश देते.