थेट व्हिडीओच पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांनी उघड केले शरद पवारांचे खोटे वक्तव्य

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून वनवासी हा शब्द आदिवासींना मान्य नाही, असा दावा केला. त्याच वेळी मोदी यांनी परवा भोपाळच्या कार्यक्रमात आदिवासी हा शब्द कधीच वापरला नसल्याचाही दावा केला होता.

यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे, मूलनिवासी, आदिवासी, वनवासी या शब्दांवरून देशभरात वाद आहे. असे असताना पवार यांनी मोदींवर टीका केल्याने आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आले आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भोपाळच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान मोदी हे जनजाति आणि आदिवासी अशा शब्दांचा उल्लेख करत या कार्यक्रमात जनतेला संबोधित करत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यामुळे फडणवीस यांनी पवारांचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

याबाबत पोस्ट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्री शरद पवार जी, आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत.

आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. असे म्हणत त्यांनी पुरावाच सादर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर आदिवासी संमेलनाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संमेलनाला संबोधित करताना दिसत आहेत. आपल्या भाषणात मोदींनी आदिवासी हा शब्द वापरल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांनी या प्रकरणाची पोलखोल केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.