Pope Francis : ख्रिश्चन कॅथोलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे अंत्यसंस्कार रोममधील सांता मारिया मॅगीओर बॅसिलिकामध्ये पार पडले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव तीन दिवस सेंट पीटर बॅसिलिकामध्ये सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचे पार्थिव सेंट पीटर बॅसिलिकामधून सेंट पीटर स्क्वेअरमध्ये आणले गेले, जिथे प्रार्थना सभेचे आयोजन झाले होते.
पोप यांच्या अंतिम दर्शनासाठी जगभरातील १७० देशांचे प्रतिनिधी आले होते. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिले, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आदी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच, विविध देशांतील अनेक धर्मगुरूही उपस्थित होते.
शनिवारी दुपारी दीड वाजता पोप फ्रान्सिस(Pope Francis) यांची अंत्ययात्रा सुरू झाली. कार्डिनल्स कॉलेजचे डीन जियोव्हानी बॅटिस्टा रे यांनी या विधीचे नेतृत्व केले. पोप यांच्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्यात आले नाही. दरम्यान, शनिवारी पहाटेपासून सेंट पीटर स्क्वेअरवर लोक मोठ्या संख्येने जमले होते. संध्याकाळपर्यंत अडीच लाखांहून अधिक नागरिकांनी त्यांच्या श्रद्धांजलीत सहभाग घेतला.
पोप फ्रान्सिस यांचे २१ एप्रिल रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे निधन झाले होते. अखेर त्यांच्या पार्थिवाला सांता मारिया मॅगीओर बॅसिलिकामध्ये दफन करण्यात आले.
pope-francis-merges-into-infinity