Eknath Shinde : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढता अबोला? शिंदे भाईंचं गणित काही जुळेना, देवाभाऊंशी नेहमीसारखी बोलणी सुरूच होताना दिसेना

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील दुरावा अधोरेखित होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नेतृत्वाखाली बालेकिल्ल्यात सुरू असलेल्या कथित फोडाफोडीच्या हालचालींवर नाराजी व्यक्त करण्यासाठी शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेत आपली तक्रार मांडली.

मात्र, शाह यांनी संपूर्ण घडामोडींची माहिती असल्याचे सांगितले असले तरी शिंदे यांच्या नाराजीत दिलासा देणारा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उलट, केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांच्याशी अधिक जवळीक ठेवत असल्याच्या चर्चेमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाल्याचे संकेत मिळत आहेत.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र प्रवास केल्याने त्यांच्या नात्यातील तणाव स्पष्ट झाला. अजित पवार (Ajit Pawar) आणि फडणवीस एकत्र दिसले, तर शिंदे यांनी एकटेच प्रवास केला. सोहळ्यातही ते एकत्र दिसले नाहीत. यानंतरही 21 नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये संवाद न झाल्याने राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळाले.

मुंबईत परतल्यानंतरही परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच शंकेची झाली. हुतात्मा चौकातील कार्यक्रमात दोघे एकमेकांसमोर आले, नमस्काराची देवाणघेवाण झाली; पण नेहमीची जवळीक, सहजता आणि देहबोली मात्र दिसली नाही. दोघांच्या चेहऱ्यावरील गंभीर भावांनी ‘सगळं आलबेल नाही’ हेच दाखवून दिलं.

दरम्यान, काही दिवसांपासून राज्यात भाजपकडून माजी नगरसेवकांना आर्थिक प्रलोभन देऊन फोडाफोडी केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या शिवसेना (Shiv Sena) गटावर लक्ष केंद्रीत करून सदस्य तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. या पार्श्वभूमीवरच त्यांनी दिल्ली गाठून शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. या सर्व घडामोडींमुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढत असल्याची भावना जनतेत आणि राजकीय वर्तुळात स्पष्टपणे दिसू लागली आहे.