शनिवारी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला आग लागल्यामुळे गुदमरुन १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. या लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जीव गमावलेल्या बालकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत देण्यात येणार आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनाप्रकरणी पीडित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. तसेच या घटनेत जे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. “महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो.” असे ट्विटही पंतप्रधान मोदींनी केले होते.
दरम्यान भंडाराची दुर्घटना समोर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा तातडीचा आढावा घेतला आणि मृत बालकांच्या पालकांना पाच लाखांची मदत जाहीर केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी प्रत्यक्ष दुर्घटना घडलेल्या रुग्णालयाला आणि पीडित कुटुंबांना भेट दिली.
सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्याचा सल्ला; शेतकरी नेते म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला घेतलं फैलावर; ‘कृषी कायदे स्थगित करा नाहीतर…’
राज्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका वाढला! अंडी, चिकन खाणाऱ्यांना पशूसंवर्धनमंत्र्यांनी दिला ‘हा’ सल्ला