Rahul Gandhi on Narendra Modi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीत (Delhi) पार पडलेल्या ओबीसी (OBC) भागीदारी न्याय महासंमेलनात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पंतप्रधान मोदी काही मोठी समस्या नाहीत, मीडियानेच त्यांना मोठं केलंय.”
राहुल गांधी म्हणाले, “मीडिया आणि तुम्हीच त्यांना डोक्यावर बसवलंय. मी काही वर्षांपूर्वी मोदींना भेटलो नव्हतो. आता दोन-तीन वेळा भेटलो आणि समजलो की त्यांच्यात काही दम नाही. तो सगळा एक शो आहे. मी त्यांच्या सोबत खोलीत बसलो आहे. त्यामुळे खात्रीपूर्वक सांगतो सगळा शो आहे, काही दम नाही.”
संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ
शिवसेना (Shiv Sena – Thackeray) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल गांधींचा हा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) वरून शेअर केला. त्यामुळे या विधानाला राजकीय वर्तुळात चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
ओबीसी जनगणनेबाबत आत्मपरीक्षण
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “मी 2004 पासून राजकारणात आहे. 21 वर्षांमध्ये मी मागे वळून पाहताना हे जाणतो की काही गोष्टी चुकल्या. आम्ही मनरेगा, ट्रायबल बिल, जमीन अधिग्रहण कायदा केले. मात्र, एक गोष्ट राहिली मी ओबीसी समाजाच्या इतिहासाची आणि समस्यांची नीट माहिती घेतली नाही. त्यामुळे त्या वर्गाच्या रक्षणासाठी आवश्यक पावले उचलता आली नाहीत. ही माझी चूक होती.”
“जातनिहाय जनगणना हे माझं पहिले पाऊल आहे. ओबीसी वर्गासाठी डबल स्पीडने काम करण्याचा माझा निर्धार आहे. माझ्यात दम असेल, तर तो तुमच्यामुळेच. तुमच्या बळाशिवाय राहुल गांधी काहीच नाही,” असंही ते म्हणाले.