Khultabad : खुलताबाद तालुक्यातील इंदापूर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी नवविवाहितेच्या अपहरणाचा कट वऱ्हाडी मंडळीच्या सतर्कतेमुळे फसला. या गोंधळात पळून जात असताना अपहरणकर्त्यांच्या वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिली. यात पंडित केरुबा भालेराव (वय ५२, रा. इंदापूर) यांचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले.
पिशोर येथून लग्न सोहळा आटोपल्यानंतर वऱ्हाड बाजारसावंगी येथे परतत असताना जय भवानी मंगल कार्यालयाजवळ पांढऱ्या रंगाच्या कारने नवविवाहितेच्या गाडीला आडवले. आरोपींनी गाडीतून उतरून नवविवाहितेला जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वऱ्हाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने हा प्रयत्न उधळून लावण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय फराटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आकाश मते, ज्ञानेश्वर मते, एजाज शहा, कासिफ खान, रोहित भालेराव आणि विनोद कसारे या सहा जणांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश मते व नवविवाहितेचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र अचानक तिचे लग्न ठरल्याने आकाशने मित्रांसह फिल्मी शैलीत तिला पळवून नेण्याचा कट रचला होता. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला आणि दुर्दैवाने एका निरपराध व्यक्तीचा जीव गेला.
plot-to-kidnap-newlyweds-in-indapur-evening-in-khultabad-taluka