अवघ्या तीन गुंठ्यांत फुलवला ७५ प्रकारच्या पिकांचा शेतमळा, भांगे कुटुंबियांच्या अनोख्या शेती मॉडेलची चर्चा

प्रत्येक कुटुंबाला भाजीपाला आणि फळ बाजारातून आणावी लागतात. परंतु भांगे कुटुंबाला लागणारा भाजीपाला आणि बरीच फळ बाहेरुन खरेदी करावी लागत नाहीत. या कुटुंबासाठी लागणारी भाजी आणि फळ ते विकत घेण्यापेक्षा आपल्या शेतातच पिकवतात. यासाठी कुटुंबाने विकसित केलेल्या अनोख्या शेती मॉडेलची आज गावोगावी चर्चा आहे.

भांगे कुटुंब भाजीपाल्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेच पण विशेष बाब म्हणजे तो सर्व भाजीपाला अगदी सेंद्रीय पद्धतीने कोणत्याही रसायनांचा वापर न करता पिकवलेला असतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार हे अनेकांना वेगळं सांगण्याची गरज नाही.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अवघ्या तीन गुंठ्यांत वेगवेगळ्या ७५ प्रकारची पिके घेण्याचे काम मनीषा भांगे आणि त्यांचा मुलगा गुरू भांगे करत आहेत. एवढ्या कमी जागेत भांगे कुटुंबाने फुलवलेल्या शेतमळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील खैरेवाडी याठिकाणी गेल्या सात वर्षांपासून भांगे कुटुंब शेतीत हा अनोखा प्रयोग करत आहे. यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळाले आहे. त्यांनी तीन गुंठे म्हणजेच तीन हजार चौरस फूट जागेत २५ प्रकारच्या भाज्या, १६ प्रकारची फळझाडे, १५ औषधी वनस्पती, १२ फुलझाडे आणि ६ वन झाडे लावली आहेत.

कमी जागा असल्याने त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे होते. यासाठी संपुर्ण जागेचे दोन विभाग करण्यात आले. त्यातील ६०० चौरस फूट जागेत फळभाज्या आणि पालेभाज्या लावल्या. त्यात सात गादी वाफे तयार केले गेले. यावर मेथी, शापू, पालक, भेंडी, गवार, मुळा, कारले, दुधी भोपळा ही पिके घेतली जातात.

बाकी शिल्लक जागेत १०-१० फुटांवर एक फळझाड लावण्यात आले. अशा चार रांगा करण्यात आल्या. यामध्ये पेरू, अंजीर, सीताफळ, आंबे, केळी, चिकू, डाळींब, आवळा, नारळ, खारीक यांची झाडे आहेत. फळ व भाज्यांच्या झाडांच्या मधल्या जागेत औषधी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. यामध्ये तुळस, पुदिना, ओवा, शतावरी, अश्वगंधा, अडुळसा, कोरफड, कडीपत्ता यांचा समावेश आहे.

वन झाडांमध्ये साग, चंदन, लिंब, अशोक या झाडांचा समावेश आहे. या शेतीसाठी खत म्हणून गांडूळ खत वापरले जाते. याशिवाय जिवामृताचा वापर केला जातो. या तीन गुंठे जागेतच कुटुंबाला आठवड्याला लागणारा दोनशे ते तिनशे रुपयांचा भाजीपाला खर्च कमी होतो. महत्वाचे म्हणजे सेंद्रीय अन्न खाण्यासाठी मिळते. आपण निरोगी जीवन जगू शकतो. असे गुरू भांगे यांचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या-
“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
आता घरातच करा कोरोना टेस्ट, पुण्यात लागला किटचा शोध, मान्यताही मिळाली
कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती मिळतो पगार? उत्तर प्रदेश आहे तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.