Jalna : जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयात (Bhokardan Rural Hospital) घडलेली एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खापरखेडा वाडी (Khaparkheda Wadi) येथून उपचारासाठी आलेल्या एका गर्भवती महिलेला (Pregnant Woman) तपासणीच्या वेळी डॉपलर टेस्टदरम्यान जेलीऐवजी चुकून फिनायल (Phenyl) लावण्यात आलं. त्यामुळे तिच्या पोटाची त्वचा भाजून निघाली असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
सदर गर्भवती महिला, शिला संदीप भालेराव (Shila Sandeep Bhalerao) यांना प्रसूतीसाठी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांची सुरक्षित प्रसूती झाली. त्यानंतर बाळाचे ठोके तपासण्यासाठी डॉपलर तपासणी करताना, रुग्णालयातील एका सिस्टरकडून (Hospital Nurse) चुकून फिनायलसारखे केमिकल वापरले गेले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर डॉ. राजेंद्र पाटील (Dr. Rajendra Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “महिला तिसऱ्यांदा गरोदर होती. सकाळी प्रसूतीनंतर डॉपलर टेस्ट करताना, जेलीऐवजी फिनायलसदृश रसायन वापरले गेले. त्यामुळे त्वचेवर ‘सुपरफिशियल बर्न’ झाला आहे. यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या आई आणि बाळ दोघेही स्थिर आहेत.”
डॉ. पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, “हे घडले ते अपघाताने की हेतुपुरस्सर, याचा तपास वैद्यकीय अधीक्षक करत आहेत. आम्ही अॅसिड वापरत नाही. यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे.”
नातेवाईकांचा संताप
सदर महिलेच्या नातेवाईकांनीही आपली नाराजी व्यक्त केली. “आम्ही सकाळी सहा वाजता महिलेला रुग्णालयात आणलं. साडेसहाला बाळाचे ठोके तपासले जात असताना, औषधाऐवजी दुसरं अज्ञात रसायन वापरलं गेलं. यामुळे त्वचेचं नुकसान झालं,” असं नातेवाईकांनी सांगितलं.
त्यांनी पुढे म्हटलं, “आता संबंधित डॉक्टर (Doctor) आणि सिस्टर (Nurse) यांच्यावर योग्य ती कारवाई होईल का, हे पाहणं गरजेचं आहे.”
संपूर्ण घटनेच्या चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. सरकारी रुग्णालयातील ही निष्काळजीपणाची घटना गंभीर असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं नागरिक आणि सामाजिक संघटनांनी म्हटलं आहे.