Patna : एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बिहारच्या राजधानीत घडली आहे. पाटणा (Patna) येथील जानीपूर (Janipur) परिसरातील नगवा (Nagwa) या गावात काही अज्ञात व्यक्तींनी दोन निष्पाप मुलांना घरात घुसून जिवंत पेटवून दिलं. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, जन्मदात्यांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचं काळीज सुन्न झालं आहे.
मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं अंजली (Anjali) आणि अंश (Ansh) अशी असून त्यांचं वय अनुक्रमे १० आणि १२ वर्षं होतं. त्यांच्या आई शोभा देवी (Shobha Devi) या एम्स (AIIMS) रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. वडील ललन कुमार गुप्ता (Lalan Kumar Gupta) हे निवडणूक आयोगात (Election Commission) कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी दोघंही घरी नव्हते.
दिवसाच्या वेळेत शाळेतून परतल्यानंतर अंजली आणि अंश घरी आले आणि झोपी गेले. त्याच वेळी काही अज्ञात व्यक्तींनी घरात शिरून दरवाजा बंद केला आणि खोलीला आग लावली. काही वेळातच घरातून धूर निघू लागला. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ ललन गुप्ता आणि पोलिसांना कळवले. पण दुर्दैवाने तोपर्यंत दोन्ही मुलं आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले होते. त्यांच्या मृतदेहांचे अवशेष पलंगावर आढळले.
या घटनेमागे कट असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. काही दांडग्या स्थानिकांनी मुद्दामहून ही आग लावल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे या घटनेचा तपास करताना पोलिसांनी फॉरेन्सिक (Forensic) पथक, श्वान पथक आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला घटनास्थळी बोलावलं आहे.
मुलांचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी या आगीमागे जाणूनबुजून केलेला घातपात असल्याचा ठाम आरोप केला आहे. “आमच्या मुलांना जाळलं गेलं… कोणीतरी हे योजना करून केलंय,” असा भावनिक आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.