Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कारण, पुण्यातील मुंढवा (Mundhwa) परिसरातील वादग्रस्त जमीन व्यवहाराशी संबंधित त्यांच्या अमेडिया कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा ‘जिजाई’ बंगला असल्याचे समोर आले आहे. हा बंगला अजित पवार यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे या प्रकरणाला नव्या वादाची किनार लाभली आहे.
अमेडिया कंपनीने पुण्यातील मुंढवा येथील तब्बल १,८०० कोटींच्या बाजारभावाची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी केली. या खरेदी-विक्री प्रक्रियेत शासनाची तब्बल १५२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या व्यवहारासाठी फक्त ५०० रुपयांचेच मुद्रांक शुल्क भरले गेले. यानंतर सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू (Ravindra Taru) यांना निलंबित करण्यात आले आहे.
आता नवीन प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, जर पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीचे कार्यालय निवासी बंगल्यात सुरु केले असेल, तर त्यांनी महापालिकेकडे त्या मालमत्तेचा कर व्यावसायिक दराने भरला का? या बाबतीत चौकशी करण्याची मागणी अधिक जोमाने केली जात आहे.
हा बंगला मूळ बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांचा असून, अजित पवार तिथे भाडेतत्त्वावर राहतात. विशेष म्हणजे, या बंगल्याचा पत्ता पूर्वी आदर्श घोटाळ्यातही वापरण्यात आला होता. त्यामुळे ‘जिजाई’ बंगला पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
या प्रकरणात पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे पार्थ पवारांचे नाव पुन्हा चर्चेत आले असून, या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी अजित पवारांना नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो आणि वडिलांना त्याची कल्पनाही नाही, हे पटतं का? विशेष म्हणजे, त्या वेळी अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री आहेत. बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन खरेदी केली गेली, त्यामुळे खडसेंप्रमाणे चौकशी होईपर्यंत तुम्हीही राजीनामा द्या.”
दानवे यांनी पुढे म्हटलं की, “न्यायमूर्ती झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क (Koregaon Park) प्रकरणातही मुख्यमंत्री समिती नेमावीत.” विरोधकांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशी पारदर्शकपणे करण्याची मागणी केली आहे.





