“पानसरे, दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना न पकडणारे सुशांतसिंहच्या आरोपींना काय शोधणार”?

अहमदनगर । दाभोळकर-पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अनेक वर्षांनंतरही सीबीआयने पकडले नाही. सीबीआय सुशांतसिंहच्या मारेकऱ्यांचा काय शोध लावणार, असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

दूध दरवाढ आंदोलनासाठी राजू शेट्टी नगरमध्ये होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, रोज अनेक शेतकरी, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत.

ऑक्सिजनअभावी कोरोनाग्रस्तांचा जीव जात आहे. सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, परंतु एका नटाने आत्महत्या केली तर त्यावर केंद्र व राज्य ही दोन्ही सरकारे राजकारण करत आहेत.

प्रसारमाध्यमेही त्या पाठीमागे धावत आहेत अशी टीका त्यांनी केली. दूध दरवाढीचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न यावर चर्चा होत नाही. सुशांतसिंह एक चांगला कलाकार होता.

आत्महत्येबद्दल दु:ख आहे, परंतु केंद्र व राज्य सरकारने राजकारण थांबवले पाहिजे, असेही ते म्हणाले. उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली, यावर शेट्टी यांनी, वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुळात कृषिमूल्य आयोग म्हणजे ‘शेंडा ना बुडूख’ राहिलेली संस्था आहे. शेतकऱ्यांचे १९३ रुपयांचे नुकसान झाले त्यानंतर १०० रुपयांची वाढ केली.

गेल्या दोन वर्षांत केवळ २०० रुपये वाढ झाली आहे, म्हणजे शेतकऱ्यांना केवळ सात रुपयांचा फायदा झाला आहे, अशी टीका ही राजू शेट्टी यांनी केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.