रस्ता विसरून पाकिस्तानचा मुलगा आला भारतात, आधी सैनिकांनी त्याला जेवण दिलं मग…

 

शुक्रवारी राजस्थानच्या बाडमेर येथील भारत पाकीस्तान बॉर्डरवर पाकिस्तानचा एक मुलगा चुकून भारताच्या हद्दीत आला होता. त्याला भारतीय सीमा सुरक्षा दलातील सैनिकांनी पुन्हा पाकिस्तानात पाठवले आहे.

विशेष म्हणजे भारतीय जवानांनी त्याला सीमेपलीकडे पाठवण्याआधी त्याच्या जेवणाची व्यवस्थाही केली होती. जेवणानंतर फ्लॅग मिटिंग घेऊन त्यांनी पाकिस्तान रेंजर्सला बोलावले आणि त्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले.

पाकिस्तानी मुलाचे नाव करीम होते. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता करीम चुकून भारताच्या हद्दीत आला होता. त्याला सीमा रक्षकांनी बघितल्यानंतर त्याची विचारपूस असता त्याने पाकिस्तानी असल्याचे सांगितले.

त्यानंतर जवानांनी त्याला जेवण दिले आणि पाकिस्तानच्या सैनिकांसोबत मिटिंग घेतली. पुढे या आठ वर्षाच्या मुलाला पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, बाडमेर जिल्ह्यातील सज्जन पारचा रहिवासी असलेला गमराराम सहा महिन्यांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. परंतु पाकिस्तान त्याला पुन्हा भारतात पाठवण्यासाठी कोणतीच पावले उचलत नाहीये.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.