Sanjay Raut : “पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती” – संजय राऊत

Sanjay Raut : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या भयानक घटनेत २६ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. या घटनेनंतर तातडीने घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गटाने सहभाग नोंदवला नव्हता. मात्र, आता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताच्या प्रभावी कारवाईनंतर ठाकरे गट सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार आहे, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

“पहिले प्रत्युत्तर, मग चर्चा” – संजय राऊत

संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सांगितले की, “हल्ल्यानंतर तातडीने कारवाई व्हायला हवी होती. आम्ही त्यामुळे पहिल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झालो नाही. पण आता कारवाई झाली आहे, ती अत्यंत प्रभावी होती. त्यामुळे आता आम्ही पुढील बैठकीला हजेरी लावणार आहोत.”

दहशतवाद्यांचा खात्मा – भारतीय लष्कराची कामगिरी कौतुकास्पद

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे केवळ २५ मिनिटांत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ही कारवाई RAW च्या माहितीनुसार अचूकपणे पार पडली असून देशभरातून तिचे कौतुक होत आहे.

“आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार” – संजय राऊत(Sanjay Raut)

“भारतीय लष्कर जबाबदारीने काम करते. आम्ही दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे, पाकिस्तानच्या नागरिकांवर नाही. २६ निरपराध नागरिकांच्या मृत्यूनंतर आम्ही योग्य ती प्रतिक्रिया दिली. हे आमचं स्वसंरक्षण आहे,” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

सीमेवर तणाव वाढला, पाकिस्तानकडून गोळीबार

भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील गावांवर जोरदार गोळीबार केला. यात १६ नागरिक ठार आणि १५० पेक्षा अधिक जखमी झाले. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “जर पाकिस्तानला युद्धच हवं असेल, तर भारत सज्ज आहे. मात्र आपण युद्ध पुकारलेले नाही. आम्ही केवळ दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे.”

“पाकिस्तानला दुर्लक्ष करू नये”

राऊत यांनी पुढे सांगितले की, “पाकिस्तानच्या स्लीपर सेल्सवर सतत नजर ठेवली पाहिजे. मुंबईसारखी शहरे सुरक्षित ठेवणं ही गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे. अंतर्गत सुरक्षेकडे दुर्लक्ष करता कामा नये.”
pakistan-should-not-be-underestimated-says-sanjay-raut