Share

Shahid Afridi : पाकिस्तानची वेगाने प्रगती सुरु, पण भारत आम्हाला रोखतोय; शाहीद आफ्रिदीचं वक्तव्य

Shahid-afridi.

Shahid Afridi : भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसंधी झाल्यानंतरही पाकिस्तानमधील नेते आणि काही माजी खेळाडू सातत्याने भारतविरोधी वक्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने पुन्हा एकदा भारताविरोधात वादग्रस्त विधाने करून खळबळ उडवून दिली आहे.

भारताच्या प्रगतीवरून आफ्रिदीचा अस्वस्थ सवाल

कराचीत काढण्यात आलेल्या एका ‘विजयी रॅली’ दरम्यान आफ्रिदीने वक्तव्य करत म्हटलं, “भारत प्रगती करत आहे, त्याबद्दल आम्ही खुश आहोत. पण पाकिस्तानही वेगाने प्रगती करत आहे. मात्र, भारत आम्हाला रोखत आहे. हे शेजाऱ्यांचे काम आहे का?” अशा शब्दांत त्याने भारतावर आरोप ठेवत पाकिस्तानची ‘विकास अडथळा’ म्हणून टीका केली.

पंतप्रधान मोदींवर निशाणा

आपल्या भाषणात आफ्रिदीने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. “मोदींनी युद्धाची खुमखुमी दाखवून देशाला संकटात ढकलले. पाकिस्तानशी युद्ध करणं किती महागात पडू शकतं हे आता त्यांना कळालं असेल,” असे म्हणत त्याने भारताच्या लष्करी कारवाईची किंमत मोजावी लागल्याचा दावा केला.

दहशतवादी नाते पुन्हा चर्चेत

शाहीद आफ्रिदीच्या कुटुंबातील त्याचा चुलत भाऊ शाकिब हरकत उल अंसार या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता, ज्याला २००३ साली अनंतनागमध्ये भारतीय लष्कराने चकमकीत ठार केलं होतं. बीएसएफच्या अहवालानुसार, शाकिबकडे सापडलेली कागदपत्रं त्याचं दहशतवाद्याशी संबंधित असलेलं नातं अधोरेखित करत होती. मात्र, आफ्रिदीने नेहमीप्रमाणेच हे नातं फेटाळून लावलं.

पूर्वीच्या वादग्रस्त विधानांची पुनरावृत्ती

शाहीद आफ्रिदी यापूर्वीही अनेक वेळा भारत सरकार आणि भारतीय सैन्याविरोधात वादग्रस्त विधानं करून वादात सापडला आहे. विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळी, आफ्रिदीने भारतीय लष्करालाच जबाबदार धरलं होतं, ज्यामुळे त्याच्यावर भारतात तीव्र टीका झाली होती.

भारताच्या संयमाचं पाकिस्तानकडून अपप्रचारात रूपांतर?

भारताने अल्प वेळात पाकिस्तानी सैन्यावर निर्णायक कारवाई केली असली तरी, पाकिस्तानकडून ती ‘विजय’ म्हणून साजरी करण्याचा हास्यास्पद प्रयत्न सुरू आहे, असे भारतीय लष्करी विश्लेषकांचं म्हणणं आहे. शस्त्रसंधी ही दोन्ही देशांच्या हितासाठी असते, मात्र त्याचा वापर करून भारताविरोधात गरळ ओकणे आणि आक्रमक राजकारण करणं ही पाकिस्तानच्या नेतृत्वाची पद्धतच बनली आहे, अशीही टीका होत आहे.

भारतीय जनतेत संतापाची लाट

शाहीद आफ्रिदीच्या या नव्या विधानांमुळे भारतीय जनतेत आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी त्याला ट्विटर आणि अन्य प्लॅटफॉर्मवर टीकेचं लक्ष्य केलं आहे. काहींनी तर त्याच्या भारतप्रवेशावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.
pakistan-is-making-rapid-progress-but-india-is-stopping-us-shahid-afridis-statement

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now