स्वतःचे शेत आहे पण शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? मग ‘असा’ करा शेतरस्त्यासाठी अर्ज

एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतात जायला रस्ता नसेल तर तो आपल्या शेजारच्या शेतमालकला त्याच्या शेतातून रस्ता काढण्यासाठी विनंती करतो. पण अशावेळी जर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्याला नकार दिला किंवा विरोध केला तर त्याला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागतो.

जर तुम्हालाही ही समस्या येत असेल तर त्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहेत. नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा? आणि यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर स्वतःच्या शेतात जायला रस्ता पाहिजे असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम १४३ अन्वये नविन शेत रस्त्यासाठी शेतकऱ्याला अर्ज करता येतो. शेतकऱ्याला हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरून दिला जातो.

यासाठी तहसिलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज करावा लागतो. तुम्ही ज्या तालुक्याचे रहिवासी या आहात त्या तालुक्याच्या तहसीलदाराच्या नावाने तुम्हाला अर्ज लिहायचा आहे. त्यानंतर कशाच्या आधारे तुम्ही हा अर्ज करणार आहात ते लिहा. उदा. १९६६ च्या कलम १४३ अन्वये नविन शेत रस्त्यासाठी शेतकऱ्याला अर्ज करत आहे.

त्याच्या खाली अर्जाचा विषय लिहायचा आहे. विषयात लिहायचे की, शेतात येण्या-जाण्यासाठी कायमस्वरूपी जमिनीच्या बांधावरून रस्ता हवा आहे. असा विषय टाकायचा आहे. यानंतर अर्जदाराचे नाव आणि शेतीच्या माहितीचा तपशील द्या. यामध्ये अर्जदाराचे नाव आणि गाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे. त्याखाली आपल्या शेतीचा तपशील टाका.

यानंतर अर्जदाराच्या शेताच्या शेजारी कोणाकोणाची शेती आहे. त्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता लिहा. शेतीच्या चारही दिशेला ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्या चारही शेतकऱ्यांची नावे लिहा आणि पत्ते लिहा.

आता अर्जाचा मायना कसा लिहायचा ते जाणून घ्या. मी..गावाचे नाव..गट क्रमांक.. मध्ये माझ्या मालकीची..शेतजमीन आहे. पुढे तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता का हवा आहे त्याचे कारण लिहा. अर्जासोबत शेजारील आणि अर्जदाराच्या शेतीचा कच्चा नकाशा जोडावा लागेल.

अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील सातबारा उतारा लागेल. शेजारील शेतकऱ्यांची नावे आणि त्यांचे पत्ते त्यांच्या जमिनीचा तपशील. अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रे. या सर्व कागदपत्रांसह तहसीलदाराकडे अर्ज करा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.