मंदीत संधी! हा तरुण रोज मिळवतोय तब्बल एवढे पैसे, नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच वाचा..

सिंधुदुर्ग । कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र संगमेश्वर तालुक्यातील चांदीवडेवाडी येथील चंद्रकांत रत्ना चांदीवडे हा तरुण मात्र त्याला अपवाद आहे. त्याने मंदीतही संधी शोधून खाण्याच्या पानाचा व्यवसाय शोधला आहे.

आपली आर्थिक समस्या सोडवून संसाराची घडी बसविण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. चंद्रकांत रोज पहाटे सहा वाजता डोक्यावर खाण्याच्या पानांची करंडी घेतो. गावच्या बारा वाड्यापैकी रोज चार वाड्या प्रत्येक घरी पायी चालत जाऊन पाने विकतो.

दोन हजार पान विक्री करून त्याला दररोज चारशे ते पाचशे रुपये मिळतात. सांयकाळीही मागणीप्रमाणे तो लोकांना पानाबरोबर जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम करतो.

व्यवसाय हा लाज न बाळगता केल्यास आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल, असे चंद्रकांतचे म्हणणे आहे. चंद्रकांत म्हणाला, लॉकडाउनपूर्वी मुंबईत मिळेल ते काम केले. पेंटिंगचे काम मिळाले.

मात्र त्यामध्येही नियमितता नसल्याने मंडप बांधणीमध्ये स्वतःला झोकून देत काम केले. यातूनच पुढे मात्र कोकणचा सांस्कृतिक ठेवा फिरता बहुरंगी ‘नमन’ या कला प्रकारामध्ये ‘मेकअपमन’ म्हणून काम मिळाले.

गावी शेती आहे, पण त्यातून कुटुंबाला पुरेल एवढे उत्पन्न मिळत नाही. लॉकडाउनमध्ये गावी आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी लोकांची गरज ओळखून त्याने पान विक्रीचा व्यवसाय निवडला.

सकाळी वाडीमध्ये जाताच पानवाले आले, अशी आरोळी मारताच पुरुषांबरोबर महिलाही पाने घेण्यासाठी बाहेर येतात. चुना, सुपारीची दारातच सोय होत असल्याने चंद्रकांत यांची लोक आता आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.

त्याने इतर वस्तूही सोबत ठेवल्याने महिलांची सोय झाली आहे. सकाळपासून दुपारी एकपर्यंत दोन हजार पानांची विक्री होत असल्याने पुढचा वेळ घरी व इतर कामाला मिळत असल्याचे तो म्हणाला.

अनेक तरुण नोकरी नाही म्हणून ओरडत असतात. मात्र असा छोटा व्यवसाय सुरू केला तरी त्यामधून पैसे मिळू शकतात हे चंद्रकांतने दाखवून दिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.