Mumbai Indians : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा उपाययोजनांमध्ये मोठा बदल करत उत्तर भारतातील काही महत्त्वाचे विमानतळ १० मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सामन्यांवर झाला असून, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात ११ मे रोजी धरमशालामध्ये होणारा सामना आता मुंबईत होणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
धरमशाला ऐवजी वानखेडेवर सामना
धरमशाला विमानतळ बंद झाल्यामुळे मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर हलवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम मुंबईला घरच्या मैदानाचा फायदा मिळणार असून प्ले-ऑफच्या शर्यतीत महत्त्वपूर्ण सामना ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सने मागील लढतीत शेवटच्या चेंडूवर पराभव स्वीकारला होता. अशा स्थितीत घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणं त्यांच्या प्ले-ऑफच्या आशा टिकवण्यासाठी महत्त्वाचं ठरेल.
दिल्ली-पंजाब सामना ठरल्याप्रमाणेच?
दरम्यान, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज, ८ मे रोजी होणाऱ्या सामन्याबाबत अनिश्चिततेचं वातावरण आहे. मात्र, दोन्ही संघ आधीच धरमशालामध्ये दाखल झाले असल्यामुळे हा सामना नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेने सांगितले.
विमानतळ बंदीमुळे अडचणी
चंडीगड आणि धरमशाला येथील विमानतळ बंद असल्यामुळे संघांना स्थलांतर करणे मोठं आव्हान ठरत आहे. चंडीगडहून धरमशालापर्यंत रस्त्याने प्रवास करणे सुमारे सहा तासांचं असून, यामध्ये केवळ खेळाडूच नव्हे तर संघमालक, अधिकारी व निमंत्रित यांचा प्रवासही अपेक्षित असतो. त्यामुळे ‘मुंबई-पंजाब’ सामना मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
उत्तर भारतातील आगामी सामने धोक्यात?
धरमशाला व्यतिरिक्त जयपूर, लखनऊ आणि नवी दिल्ली येथे होणाऱ्या आगामी IPL सामन्यांबाबतही केंद्र सरकार आणि बीसीसीआय दरम्यान चर्चा सुरू आहे. सध्या ९ ते १६ मेदरम्यान उत्तर भारतात होणाऱ्या पाच सामन्यांवर सुरक्षा स्थितीमुळे संभाव्य बदलाचे सावट आहे.
operation-sindoor-benefits-mumbai-indians-bcci-takes-big-decision