अडचणींचा सामना करत यश मिळवलेल्या अनेक चित्रपट कथा तुम्ही पाहिल्या असतील. पण खऱ्याखुऱ्या जीवनात अशीच एक कथा बघायला मिळाली आहे. लहानपणी मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकणाऱ्या तरुणीने संघर्ष करत आपले स्वप्न पूर्ण केले आहे. सरिता माली या तरुणीला अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून फेलोशिप मिळाली आहे.(Once upon a time, a girl selling flowers at a traffic signal in Mumbai came to America for her PhD)
लहानपणापासून सरिताला खूप संघर्ष करावा लागला. सहावीच्या वर्गात शिकत असताना सरिता आपल्या वडिलांसोबत मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकायची. ही फुले विकून सरिताच्या कुटुंबाला दिवसाला ३०० रुपये मिळायचे. सरिताचे बालपण मुंबईतील घाटकोपर परिसरातील झोपडपट्टीत गेले. पण आज २८ वर्षीय सरिता अमेरिकेत पीएचडी करत आहे.
लहानपणी त्वचेच्या रंगावरून सरितासोबत भेदभाव केला जात होता. पण सरिताचे वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी सरिताला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. सरिताने देखील खूप मन लावून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांचा भार वडिलांवरती पडू नये म्हणून सरिताने दहावीनंतर मुलांना शिकवणी देण्यास सुरुवात केली.
दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने केजे सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. सरिताची शिक्षणासाठीची जिद्द पाहून तिच्या भावंडांना देखील प्रेरणा मिळाली आणि त्यांनी देखील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सरिताचे वडील फार शिकले नाहीत. पण मुलीने शिक्षण पूर्ण करावे, अशी वडिलांची इच्छा होती.
सरिताने फेसबुकवर पोस्ट करत तिच्या संघर्षाची कथा शेअर केली आहे. तिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “अमेरिकेतील दोन विद्यापीठांमध्ये माझी निवड झाली आहे – कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि वॉशिंग्टन विद्यापीठ. मी कॅलिफोर्निया विद्यापीठाला प्राधान्य दिले आहे. या विद्यापीठाने मला ‘चान्सलर फेलोशिप’ बहाल केली आहे”, असे सरिताने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.
सरिता माली ही मूळची उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहे. पण तिचा जन्म मुंबईत झाला आहे. सरिताच्या वडिलांचा फुले विकण्याचा व्यवसाय होता. पण यामधून मिळणारी मिळकत फार कमी होती. त्यामुळे अनेकदा सरिताच्या कुटूंबियांना दोन वेळचं जेवण मिळणं देखील कठीण झालं होतं. पण आता सरिताच्या शिक्षणामुळे तिच्या कुटूंबियांची परिस्थिती सुधारली आहे.