Ohio Plane Crash : अमेरिकेतील ओहिओ (Ohio) राज्यात रविवारी सकाळी एक भीषण विमान अपघात झाला आहे. यंगस्टाउन-वॉरेन विमानतळावरून (Youngstown-Warren Airport) उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच एक लहान खासगी विमान जंगलात कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांसह एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून, सगळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सेसना ४४१ (Cessna 441) या डबल इंजिन असलेल्या टर्बोप्रॉप विमानाने रविवारी सकाळी यंगस्टाउन-वॉरेन विमानतळावरून उड्डाण केलं. काही अंतरावर गेल्यानंतर, विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि ते नजीकच्या जंगलात कोसळले. या ठिकाणी तीन घरं जवळ होती, पण सुदैवाने जमिनीवर कोणालाही इजा झाली नाही.
या अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये वैमानिक जोसेफ मॅक्सिन (Joseph Maxsin) वय ६३, राहणार कॅनफिल्ड (Canfield) आणि सह-पायलट टिमोथी ब्लेक (Timothy Blake) वय ५५ यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत प्रवास करणारे वेलर कुटुंबीयही मृत्यूमुखी पडले. यात वेरोनिका वेलर (Veronica Weller) वय ६८, त्यांचे पती जेम्स वेलर (James Weller) वय ६७, त्यांचा मुलगा जॉन वेलर (John Weller) वय ३६ आणि सून मारिया वेलर (Maria Weller) वय ३४ यांचा समावेश आहे. हे कुटुंब सुट्टीसाठी मोंटाना (Montana) राज्यात जात असताना ही दुर्घटना घडली.
वेस्टर्न रिझर्व्ह पोर्ट अथॉरिटीचे कार्यकारी संचालक अँथनी ट्रेव्हेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटना घडताच आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाली, मात्र ज्या भागात विमान कोसळले ते घनदाट जंगल असल्याने बचावकार्य अडथळ्यांत पार पडलं.
या अपघातामुळे काही काळापूर्वी घडलेल्या अहमदाबाद-लंडन (Ahmedabad-London) विमान दुर्घटनेची आठवण ताजी झाली. त्या दुर्घटनेप्रमाणेच या प्रकरणातही विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच तोल गमावला आणि कोसळले. फेडरल एव्हिएशन प्रशासन आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळ यांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.