Share

Nupur Bora: फक्त पाच वर्षांच्या सेवेत 400 पट संपत्ती, 93 लाख रोख, दीड कोटींचे दागिने आणि बरंच काही! उदयोन्मुख अधिकारी ते तुरुंगाची हवा, नुपूर बोरा आहे तरी कोण?

Nupur Bora: नुपूर बोरा ही घटना एखाद्या चित्रपटाच्या थरारक कथानकासारखी वाटावी अशी आहे. आसाम राज्यातील नुपूर बोरा (Nupur Bora), ज्यांना 2019 साली आसाम सिव्हिल सर्व्हिसमध्ये अधिकारी म्हणून रुजू करण्यात आलं, त्यांची ओळख सुरुवातीला मेहनती आणि आशादायक प्रशासक अशी होती. केवळ पाच वर्षांत त्यांनी इतकी संपत्ती जमवली की संपूर्ण प्रशासन हादरलं.

कामरूप जिल्ह्यातील गोराईमारी (Goraimari) येथे सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत असताना त्यांच्या आलिशान जीवनशैलीबद्दल चर्चा सुरू झाली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या विशेष दक्षता पथकाने (Special Vigilance Team) अचानक छापा टाकला आणि बोरांच्या घरातून व इतर ठिकाणांहून तब्बल 92 लाख रुपये रोख, सुमारे 1.5 कोटींचे दागिने आणि 1 कोटी रोख रक्कम जप्त झाली.

उदयोन्मुख अधिकारी ते तुरुंगवास

गोलाघाट (Golaghat) जिल्ह्याची रहिवासी असलेल्या या अधिकाऱ्याला एकेकाळी समाजासाठी आदर्श मानलं जात होतं. पण केवळ काही वर्षांतच त्यांचं नाव भ्रष्टाचाराच्या कारवायांशी जोडले जाऊ लागलं. सहा महिन्यांपासून त्यांच्यावर गुप्त देखरेख ठेवण्यात आली होती. अखेर मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली.

सहकाऱ्याशी नातं आणि संशयास्पद जमिनीचे व्यवहार

तपासादरम्यान, बारपेटा महसूल मंडळातील कर्मचारी सुरजीत डेका (Surjit Deka) यांच्याशी बोरा यांचे जवळचे संबंध असल्याचं उघड झालं. दोघांनी मिळून बारपेटा परिसरात अनेक जमिनी खरेदी केल्याचा संशय आहे. आता या मालमत्तांची चौकशी सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांचा इशारा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, बोरा यांनी मंडळ अधिकारी म्हणून कार्य करताना हिंदू समाजाच्या मालकीची जमीन बेकायदेशीरपणे इतरांच्या नावे हस्तांतरित केली आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवले. महसूल विभागात, विशेषतः अल्पसंख्याकबहुल भागात सुरू असलेला भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आलिशान जीवनशैलीमुळे संशय

साध्या पदावर काम करत असतानाही बोरा यांच्या आलिशान जीवनशैलीने प्रश्न निर्माण केले. छाप्यात सापडलेली रोकड, दागदागिने आणि प्रचंड संपत्ती पाहून सामान्य नागरिक थक्क झाले. सोशल मीडियावरही संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी म्हटलं की सामान्य जनता महसूल कार्यालयांच्या चकरा मारते, पण अधिकारी कोट्यवधी कमावतात.

सध्या नुपूर बोरा तुरुंगात असून, त्यांच्या बँक खात्यांपासून ते जमिनीच्या खरेदीपर्यंत सर्व आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. तिच्या सहकाऱ्यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now