मुंबई महापालिकेत जेवढा भ्रष्टाचार आहे, तेवढा कुठेच नाही; भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका

 

मुंबई। “मुंबई महापालिकेत जेवढा भ्रष्टाचार आहे, तेवढा कुठेच नाही”, अशी बोचरी टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. ते सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. “आज मुंबईसारखे जागतिक दर्जाचे शहर भकास होत चालले आहे. याला जबाबदार शिवसेना आहे.

मुंबई महानगरपालिकेत जितका भ्रष्टाचार आहे, तसा अन्य कुठल्याही संस्थेत नाही. दिवाळखोरीत गेलेली बेस्ट खासगीकरणाच्या दिशेने जात आहे”, अशी टीका राणे यांनी केली आहे.

“सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक नव्हे तर तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत. गेल्या अनेक महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीतून बाहेर पाऊल टाकलेले नाही.

ते बाहेर पडले तरी फार काही बोलत नाहीत. अनेक महिने मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाचे तोंडही पाहिलेले नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी आदेश पाळत नाही.

जगाच्या पाठीवर कुठेही असा मुख्यमंत्री सापडणार नाही आणि कोणी ठेवणारही नाही”, असे नारायण राणे यांनी यावेळी म्हटले आहे. “राज्यातील उद्योगधंदे कोलमडून पडले तरी मुख्यमंत्री डोळे मिटून आहेत.

लोकांना पगार मिळत नाहीत. तरी मुख्यमंत्री फक्त लॉकडाऊन करतायत. ते निष्क्रिय असल्यामुळे प्रशासन चालवू शकत नाहीत. त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच मागणी केली होती.

या मागणीवर मी आजही ठाम आहे”, असे देखील नारायण राणे यांनी सांगितले आहे. दरम्यान आता राणे यांनी केलेल्या या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.