आता तो काळ संपलाय…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा

लेह। पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अनपेक्षितपणे लेहमध्ये दाखल झाले. याठिकाणी आल्यानंतर त्यांनी लष्करी तळावरील जवानांशी संवाद साधला. तसेच पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला.

यावेळी त्यांनी विस्तारवादाचे युग संपले आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे चीनला इशारा दिला आहे. संपूर्ण जग हे विस्तारवादाच्या विरोधात आहे. सध्याचे युग हे विकासाचे युग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

शांतता ही प्रगती आणि शौर्यासाठी गरजेची आहे. मात्र, दुबळेपणा हा शांतता आणू शकत नाही. त्यासाठी वीरतेचीच गरज असते. त्यामुळे वीरांनी शौर्य गाजवून आपल्या भूमीचे रक्षण करायचे असते, असे मोदी यांनी सांगितले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैनिकांचे कौतुक केले. तुम्ही आज ज्या उंचीवर तैनात आहात त्यापेक्षा कितीतरी अधिक तुमच्या शौर्याची उंची आहे. तुमच्या शौर्यामुळे आज देशातील नागरिकांची छाती अभिमानाने फुलली आहे.

तसेच त्यांचे मस्तक आदराने तुमच्यापुढे झुकल्याचे मोदींनी म्हंटले आहे. आजपर्यंत आपण एकत्र मिळून प्रत्येक कठीण आव्हान परतवून लावले. यापुढेही आपण मिळून प्रत्येक संकटावर विजय मिळवत राहू, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

सरकारने भारत-चीन सीमेवरील खर्चात तीन पट वाढ केली आहे. त्यामुळे शस्त्रास्त्र आणि सैनिकांना लागणारी सामग्री उपलब्ध होईल, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. दरम्यान भाषणात एकदाही मोदींनी थेटपणे चीनचा उल्लेख केला नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.