आता राम मंदिराबाबतही पार्थ पवारांची शरद पवारांविरोधात भूमिका, राम मंदिराला दिल्या शुभेच्छा

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे.

श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसाजवळ येऊन ठेपली आहे.

त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत, असे पार्थ पवारांनी पत्रात म्हटले आहे. पार्थ पवार यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या आहेत.

या प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यांनी केले. काही सत्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये. या देशाच्या तरुण पिढीने राम जन्मभूमीच्या पवित्र भूमीवरुन सुरु झालेली शाब्दिक लढाई कायदेशीर आणि ऐतिहासिक पाहिली आहे.

राम जन्मभूमीच्या या जुन्या प्रकरणावर लोकशाही व्यवस्थेअंतर्गत सामंजस्य आणि शांततामय मार्गाने तोडगा निघाला हेही आपण पाहिले. यातून आपल्याला एक बोध घेता येईल.

या देशाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी काही संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि संयमाने वागले पाहिजे, असे पार्थ पवारांनी पत्रात म्हटले आहे.

पार्थ पवार सातत्याने पक्षाच्या आणि शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. सुशांतसिंग आत्महत्या तपासावरून देखील त्यांनी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतली होती.

अगोदर शरद पवारांनी मंदिर बांधून कोरोना जाणार का असे म्हणत मोदींवर टीका केली होती. मात्र पार्थ यांच्या या पत्रामुळे एक वेगळी भूमिका बघायला मिळत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.