जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान, एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.
विशेष एनआयए न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी हा निकाल सुनावला. कोर्टानं त्याला यापूर्वीच या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. याप्रकरणी आज सकाळी अंतिम सुनावणी झाली होती तेव्हा एनआयएनं मलिकच्या फाशीची मागणी कोर्टाकडं केली होती. या सुनावणीनंतर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, मलिकला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप याकडे सर्वांचे लक्ष होते.
राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) विशेष कोर्टानं 19 मे रोजी यासिन मलिक याला बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पटियाला हाऊस कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. आज सुनावणी सुरु होताच एनआयएनं दोषी मलिकच्या फाशीची मागणी केली होती.
सर्व पक्षांचा शेवटचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं याप्रकरणाचा निर्णय दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राखीव ठेवला होता. पण कोर्टानं अखेर जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. यासिन मलिकवर आयपीसी आणि युएपीए कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत.
आज कोर्टासमोर हजर करण्यात आल्यावर, एनआयएनं त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडं केली. त्यावर यासिनच्या वकिलांनी त्याची बाजू मांडली की, मी कुणापुढंही हात पसरणार नाही. कुठल्याही प्रकारची याचना करणार नाही. जे काही आहे, ते न्यायालयासमोर आहे. मी निर्णय न्यायालयावर सोडतो, असे म्हंटले.
दरम्यान, यासिन मलिक याला कठोर शिक्षा होण्याची शक्यता असल्यानं पाकिस्ताननं थयथयाट सुरू केला होता. पाकिस्तानातील अनेक मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. हा न्यायालयीन दहशतवाद आहे, असं पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी म्हटलं.