राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा; टंचाई दूर करण्यासाठी जनतेला मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | कोरोना काळात राज्यातील रूग्णालयात रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

 

कोविडच्या प्रादुर्भावामुळे रक्तदात्यांच्या संख्येत घट झाली. रक्तदानासाठी महत्वाचा स्रोत महाविद्यालयातील युवा वर्ग आहे. तसेच रक्तदानात अग्रेसर असणार्‍या बर्‍याच कंपन्या, कार्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे रक्तसंकलनात अडचणी येत आहेत.

 

कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईत आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी सरकारकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे.

 

 

सद्यस्थितील साठा…

राज्यातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट उपलब्ध आहेत. तर मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत.

 

रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रूग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.