Sharad Pawar : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्या लेखणीमुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असे स्पष्ट करत पवार म्हणाले, “राऊत नियमितपणे ‘सामना’मधून रोखठोक भूमिका मांडत होते. ती काही लोकांना सहन होत नव्हती. पत्राचाळ प्रकरण हा केवळ एक बहाणा होता; लेखणीला उत्तर देण्यासाठी कारवाईचा आधार घेण्यात आला.”
पत्राचाळ प्रकरण आणि लेखणीला शिक्षा
पत्राचाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना घर मिळावं, यासाठी राऊतांनी आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर ईडीने त्यांच्या विरोधात कारवाई केली, असं पवारांनी सांगितलं. “या प्रकरणात त्यांचा थेट संबंध नसताना, ईडीने जबरदस्तीने गुंतवले. ही कारवाई त्यांच्या पत्रकारितेच्या विरोधात होती,” असे शरद पवार म्हणाले.
58 कोटींच्या घोटाळ्यावरून सरकारला माहिती; तरीही राऊतांना अटक
पवार यांनी सांगितले की, राऊतांनी संसद सदस्य म्हणून 30–35 कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील केंद्र सरकारला पाठवला होता. सुमारे 58 कोटी रुपयांच्या व्यवहारात काही घोटाळे होते, अशी माहिती त्यांनी पुरवली. “या माहितीवर कारवाई न करता, उलट राऊतांनाच तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांच्या सत्यवचनी आणि निर्भीड स्वभावामुळेच त्यांच्यावर अन्याय झाला,” असे पवारांनी नमूद केले.
ईडीचा गैरवापर – खडसे आणि देशमुख यांची उदाहरणं
पवार यांनी ईडीच्या कथित राजकीय दुरुपयोगावरही भाष्य केलं. एकनाथ खडसे यांचे जावई इंग्लंडहून आले, तेव्हाच त्यांना अटक करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. अनिल देशमुख प्रकरणाचीही आठवण करून देत, पवार म्हणाले, “100 कोटींचा आरोप करत केस उभी राहिली, पण प्रत्यक्षात 1 कोटीची केस दाखल झाली. ज्यांनी आरोप केला होता, त्यांच्यावर राज्य सरकारनेच भ्रष्टाचाराची कारवाई केली होती.”
“संकटांवर मात करत आम्ही एकत्र राहिलो”
संजय राऊत यांच्या पुस्तकामुळे तुरुंगातील स्थिती, प्रशासनाचा दबाव, आणि राजकीय प्रतिशोध यांचं वास्तव समोर येतं, असे पवार म्हणाले. “भोसलेंसह अनेक जण त्रासले गेले, पण कोणीही नमले नाही. सगळे एकत्र राहिले, एकमेकांना धीर देत राहिले. हेच आमचं बळ आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राजकीय लेखनावर कारवाई म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच
शरद पवारांच्या भाषणातून एक स्पष्ट संदेश गेला, सत्तेच्या विरोधात लेखणीनं बोलणं म्हणजे गुन्हा ठरत आहे, आणि तपास यंत्रणांचा वापर वैयक्तिक सूडासाठी केला जातोय.
संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक केवळ कारावासाचं वर्णन नाही, तर ते आजच्या काळात लोकशाहीवर येणाऱ्या संकटाचं प्रतिबिंब आहे, असंही पवारांच्या भाषणातून अधोरेखित झालं.
no-action-was-taken-but-raut-went-inside-sharad-pawar