सुशांत प्रकरणी रियाला आदित्य ठाकरेंचं नाव का घ्यावं वाटलं?; नितेश राणेंचा सवाल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करताना अभिनेत्री रिया चक्रवर्तीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं. त्याबाबत आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरेंचे नाव घ्यावेसे रिया चक्रवर्तीला का वाटले?, आम्ही त्या दृष्टीने तपास करण्याची विनंती सीबीआयला करणार असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरेंचे नाव आम्ही कधीच घेतले नाही, आम्ही फक्त युवा नेता असा उल्लेख करत आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

आम्ही पहिल्या दिवसापासून कोणत्याही युवा नेत्याचे नाव घेतलेले नाही. भाजपच्या इतर नेत्यांनी देखील युवा मंत्री असे म्हटले आहे. अनेक तरुण मंत्री कॅबिनेटमध्ये आहेत, असं नितेश राणे म्हणाले.

आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच फक्त आपणच कॅबिनेट मंत्री असल्याचे वाटत आहे, त्यामुळे आश्चर्य वाटत असल्याचे नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले आहे. याप्रकरणी अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावेसे का वाटलं नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

14 तारखेला पार्टी झाली असे अनिल परब यांनीच ट्विट करत सांगितले. अनिल परब यांना काय माहिती आहे याची चौकशी झालीच पाहिजे. आदित्य ठाकरे यांचे नाव संजय राऊत स्वत:च घेत असून आव्हान देत आहेत, असं नितेश राणे म्हणाले.

आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्यासाठी का आतूर झाले आहेत, हे मलाच विचारायचे आहे. हे सर्वकाही शिवसेनेचे नेते जाणुनबुजून करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.

शिवसेनेत काँग्रेसप्रमाणे जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु असल्याचेही नितेश राणे यांनी म्हणाले आहेत. जुन्या शिवसैनिकांवर शिवसेनेत अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले जात असून त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

याबाबत अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

राजकारण इशाऱ्यावर केले जाऊ शकत नाही, नाव सिद्ध करु शकत नाही. जी माहिती माझ्याकडे आहे ती योग्य वेळी सीबीआयला हवी असेल, त्यांना गरज असेल, सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही टोकाला जाऊन मदत करण्यास आपण तयार आहोत. माझ्याकडे असणारी माहिती मागितल्यास आपण देण्यास तयार असल्याचेही नितेश राणे यांनी म्हणाले आहेत.

दरम्यान, आता नितेश राणेंकडे सुशांत प्रकरणी कोणती माहिती आहे आणि सीबीआय नितेश राणेंना माहिती मागतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.