‘शरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूरदेखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही’

पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे १७ एप्रिलला मतदान होणार आहे आणि २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. पंढरपुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते.

त्यांची जागा रिक्त झाल्यानंतर ही निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने आपला उमेदवार भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना जाहीर केले आहे. तर भाजपनेही त्यांच्या विरोधात समाधान आवताडे यांना आपला उमेदवार जाहीर केले आहे. त्यामुळे खुप अटीतटीची लढाई होणार आहे.

या निवडणुकीमुळे तेथील स्थानिक राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. समाधान आवताडे यांच्या प्रचाराचे काम माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आले आहे. पंढरपूर ते मंगळवेढा मतदारसंघात सध्या जोरदार प्रचार सुरू आहे.

याचदरम्यान, खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, ज्या प्रकारे शरद पवारांकडून माढा लोकसबा मतदारसंघाचीजागा काढून घेतली त्याच प्रकारे पंढरपूर विधानसभेची जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळू देणार नाही, अशी डरकाळी त्यांनी फोडली आहे.

तसेच विरोधक पोटनिवडणूकीत मृत्युचे भांडवल करून अनुकंपाच्या नावाखाली जागा भरण्यासाठी मतं मागायला येतात हे साफ चुकीचे आहे. आपल्याला लोकांना न्याय देता आला पाहिजे. लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजेत. अनुकंपाखाली जागा भरायला हे काही एसटी महामंडळ नाही अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.